शककर्ते छत्रपती शिवाजी महाराज यांची 395 वी जयंती कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याच्या वतीने पारंपारिक पद्धतीने साजरी करण्यात आली. करवीर संस्थानच्या वतीने पारंपरिक पद्धतीने बुधवारी शिव जन्मकाळ सोहळा साजरा करण्यात आला.
सकाळी ऐतिहासिक भवानी मंडपातून छत्रपती शिवरायांच्या मुर्तीची पालखीतून पारंपरिक लवाजम्यासह नर्सरी बागेतील छत्रपती शिवाजी महाराज मंदिरापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. या ठिकाणी छत्रपती घराण्याच्या प्रमुख मानकऱ्यांच्या हस्ते विधिवत पूजा करत शिवजन्मकाळ सोहळा संपन्न झाला.
खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्या हस्ते पूजा पार पडली. यावेळी कोल्हापूरच्या राजघराण्याचे दरबार शाहिर आझाद नायकवडी यांनी छत्रपती शिवरायांवर सादर केलेल्या पोवाड्याने उपस्थित रोमांचित झाले.
दरम्यान, यावेळी बोलताना खासदार शाहू महाराज म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य निश्चितच देशातील सर्वांना मार्गदर्शक आहे, त्यांनी दाखवलेल्या मार्गाने आपण पुढे जाऊ. यातून देश पुढे जाईल.
चौकट
विकिपीडिया म्हणजे इतिहास नाही, सरकारची ॲक्शन योग्य…
विकिपीडिया म्हणजे इतिहास नाही, विकिपीडियामध्ये ज्याला जे वाटते ते टाकतोय, पण ज्यांनी कोणी चुकीची माहिती टाकली त्याचा निषेध केला पाहिजे असे सांगून खासदार शाहू महाराज म्हणाले, छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल विकिपीडियावर असलेला मजकूर बदनामीकारक असल्याने तो काढून टाकायला हवा, महाराष्ट्र सरकारने त्यासंदर्भात जी कारवाई केली ती योग्य असली तरी कमी आहे.