भुदरगड, चंदगड, गडहिंग्लज तालुक्यात शाहू महाराजांचे जंगी स्वागत
कोल्हापूर
खासदार शाहू छत्रपती महाराज यांची खासदार पदी निवड झाल्यानंतर जिल्ह्यात विविध तालुक्यात आभार दौऱ्यांचे आयोजन केले असून सर्वत्र त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जनतेने त्यांचे उत्स्फूर्त स्वागत करताना अभिनंदनचा वर्षाव केला. सर्व ठिकाणी शाहू महाराज यांच्या विजयाच्या घोषणा देतानाच त्यांच्या भावी कारकिर्दीस शुभेच्छा देण्यात आल्या.
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून शाहू महाराज दीड लाखाच्या मताधिक्क्याने निवडून आले. ज्या जनतेने निवडून दिले त्या सर्वांचे आभार मानण्यासाठी शाहू महाराज प्रत्येक तालुक्याचा दौरा करणार आहेत. त्याची सुरुवात भुदरगड, गडहिंग्लज, चंदगड या तालुक्यातून करण्यात आली. तेथे महाराजांचे उस्फुर्त स्वागत करण्यात आले.
भुदरगड तालुक्यातील जनतेने अपेक्षा पेक्षा जास्त मताधिक्य दिल्याबद्दल सर्वाचे आभार मानत कोल्हापूर जिल्हाला जनतेच्या मनातील असा शाश्वत विकास करण्याचा माझा प्रयत्न आहे असे प्रतिपादन खासदार शाहू छत्रपती महाराज यांनी केले.
इथली जनता कायम चांगल्या लोकांच्या पाठीशी राहते हे या निवडणुकीतून दिसून आले. सर्वांगीण विकास हाच विश्वास मनामध्ये ठेवून पुढील काळात प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
यावेळी आमदार सतेज पाटील,माजी आमदार दिनकर के. पी. पाटील, बजरंग देसाई, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष विजय देवणे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील,काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शामराव देसाई, माजी जिल्हा परिषद सदस्य जीवन पाटील, सत्यजित जाधव , सचिन घोरपडे , पी.एस कांबळे, विलास वायदंडे, शिवसेना ठाकरे गट प्रकाश पाटील, राष्ट्रवादी शरद पवार गट संतोष मेंगाने, यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.