भाग्यश्री प्रकाशनच्या तीन पुस्तकांना पुरस्कार
म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
येथील भाग्यश्री प्रकाशनच्या तीन पुस्तकांना दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे तीन पुरस्कार मिळाले. यामध्ये हिंगणमिठ्ठा, कावेरी व ह्रासपर्व यांचा समावेश आहे. याबद्दल प्रकाशिका भाग्यश्री पाटील कासोटे यांचा सुनीलकुमार लवटे अमृत महोत्सव समिती व क्रिएटिव्ह टीचर्सचे फोरमच्यावतीने सत्कार करण्यात आला.
दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या वतीने यंदाच्या प्रकाशित पुस्तकांना पुरस्कार जाहीर करण्यात आला. त्यामध्ये भाग्यश्री प्रकाशनने पुरस्कारांची हॅट्रिक केली. यापूर्वी त्यांच्या पुस्तकांना अनेक पुरस्कार मिळाले.
सौ. भाग्यश्री पाटील कासोटे एक तरुण स्त्रीप्रकाशिका. कोल्हापूर जिल्ह्यातील एका शेतकरयाच्या घरी जन्म घेऊन , प्रतिकूल परिस्थितीशी झगडा करून एम.बी.ए.करून लग्नानंतर स्वतःची प्रकाशन संस्था स्थापना केली. प्रथितयश लेखकांची तब्बल मराठी, हिंदी, इंग्रजी, भाषांतरीत अशी 62 पुस्तके प्रकाशित केलेली आहेत.थाटामाटात करत असलेल्या पुस्तक प्रकाशनसमारंभासाठी प्रतिष्ठित , मान्यवर व्यक्ती लाभल्या आहेत . आकर्षक मुखपृष्ठ उत्तम कागद , दर्जेदार छपाई, कागद यांचा दर्जा त्यांनी कायम ठेवला आहे.
दक्षिण महाराष्ट्र साहित्यसभा , आपटे वाचन मंदिर इचलकरंजी, अक्षर सागर गारगोटी, ज्येष्ठ साहित्यिक रसूल सोलापुरे पुरस्कार असे अनेक पुरस्कार भाग्यश्री प्रकाशन संस्थेला लाभले आहेत.
……….
. पुरस्कार आणि सत्कार म्हणजे मी एक स्त्री म्हणून प्रकाशन व्यवसायात करत असलेल्या कामाची पोहोच पावती आहे. माझ्या वडीलधारी, गुरूवर्यांनी मला दिलेली कौतुकाची थाप होती. या प्रकाशन व्यवसायामुळे मला विविध क्षेत्रातील ज्येष्ठ, तज्ञ, अनुभवी माणसं मिळत गेल्याने मला जीवनात पुढे जाण्याची, काही तरी विधायक काम करण्याची ऊर्जा मिळते. हा सत्कार माझ्यासाठी प्रेरणादायी आहे.
भाग्यश्री पाटील