🌹 *असाही एक विवाह…!”— संवेदनशीलतेच्या सावलीत उमललेलं नातं*
आमचे परममित्र, शाहूवाडीचे गटशिक्षणाधिकारी डॉ. विश्वास सुतार यांनी आज एक आगळावेगळा विवाह सोहळा घडवून आणला.
शाहूवाडी परिक्षेत्रात जिल्हा परिषदेच्या शाळेतील एक शिक्षक – अनिल कांबळे.
शाहूवाडीतील एका दुसऱ्या शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत असलेल्या आणि मूळच्या कोल्हापूरपासून शेकडो मैल दूर असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील एक शिक्षिका – स्नेहा चौधरी.
डॉ. विश्वास सुतार हे खरे पाहता त्यांचे शासकीय अधिकारी.
शाळांची, म्हणजे पर्यायाने शिक्षकांची देखरेख ठेवणे हे त्यांचे काम.
पण त्याही पलीकडे जाऊन त्या शिक्षकांच्या वैयक्तिक जीवनातील काही समस्या असतात –
त्या समजून घेणे, आणि त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणे ही त्यांची खासियत.
ते गटशिक्षणाधिकारी. परंतु शिक्षण व्यवस्थेची केवळ ‘देखरेख’ करणारे अधिकारी नाहीत – तर ‘जीव लावणारे, जोडणारे, समजून घेणारे’ एक संवेदनशील व्यक्तिमत्त्व.
त्यांनी या विवाहाला केवळ संमतीच नाही दिली, तर तो घडवून आणण्यासाठी स्वतः पुढाकार घेतला.
त्या दोघा शिक्षकांच्या नात्यात ‘संवेदनशील संवादाचं सोनं’ घातलं. एका बाजूला सामाजिक परंपरा, दुसरीकडे शिक्षकांचे आर्थिक बंधन – पण या साऱ्याच्या पलीकडे होता एक ‘माणूसपणाचा निर्धार’.
यासाठी लागते – ममत्व.
यासाठी लागते – तेच समाजभान.
हे सर्व मंगलकार्य घडवून आणण्यासाठी दोन्ही बाजूंनी नियोजित वधू आणि वर यांच्यात डोळसपणे चर्चा घडवून आणली…
…आणि त्यातूनच विवाह करण्याचे ठरविले.
सावित्री- ज्योतिबांचे पुनर्जन्म?
स्नेहा चौधरीचे आई वडील म्हणून
उभं राहिलं एक मायेचं, आधाराचं जोडपं –
डॉ. विश्वास सुतार आणि सौ. वैशाली सुतार.
ते झाले वधूचे ‘पालक’.
तेच ज्योतिबा – आणि त्या सावित्रीबाई!
१४ एप्रिल – डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा दिवस – हा विवाह ‘समता आणि विवेक’ यांच्या साक्षीने घडवून आणला गेला.
लग्नाचे वराड बनले –
विश्वास सुतार यांनी चालवलेल्या “समाजभान” समूहातील सदस्य आणि शिक्षक. दोन प्राचार्य डॉ.जी.पी.माळी आणि डॉ.प्रविण चौगले
कार्यालय ठरले – “करुणालय बालगृह”…
तोही विशेष बालकांचा अनाथाश्रम.
नव्याने शिक्षक बनलेल्या जोडीस खर्चाची तोशीस लागू नये याची काळजी.
म्हणून विवाह देखील शून्य खर्चात करण्याचे ठरविले.
मुलीचे आईवडील… म्हणजे आपले ज्योतिबा आणि सावित्री…
स्वतःच्या घरातून वधूला तयार करून
मोजक्या व्हराडासोबत गाडीतून घेऊन
घरापासून २५ किमी अंतरावरील कार्यालयात घेऊन आले…
गाडीचे सारथ्य करत होते स्वतः डॉ. विश्वास सुतार…
एक गटशिक्षणाधिकारी.
आणि *सत्यशोधकी पद्धतीने विवाह विधीवत पार पडला…*
सत्यशोधकी पद्धतीने पौराहित्य केले – अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सचिव कृष्णात कोरे, आणि सुतार पती-पत्नी यांनी.
डॉ.जी.पी. माळी यांच्या संदेशपर भाषणाने विवाह सोहळ्याचा कळसाध्याय रचला.
*समाजाने या विवाहातून काय संदेश घ्यायचा?*
एक अधिकारी किती संवेदनशील असू शकतो.चंद्रपूरहून दूरवरून आलेल्या मुलीला एकटेपणा जाणवू नये म्हणून तिचे आईवडील बनून तिला भक्कम आधार देण्याचा विचार करतो –ज्योतिबा आणि सावित्री होऊन.
विवाह कार्यालयात एका शिक्षिकेला स्वतः शिक्षणाधिकारी गाडी चालवत घेऊन येतो.
किती संवेदनशील आणि कृतिशील!
आदर्श अधिकारी म्हणजे आणखी काय असते?•
याही काळात अतिशय कमी खर्चात विवाह नावाचा आनंदसोहळा साजरा करता येतो याचा हा वस्तुपाठ.
ज्योतिबा आणि सावित्री यासारखे महामानव काळाच्या पडद्याआड गेले…
… तरी त्यांचे विचार चिरंतन राहतील.
हे विचार स्वतः नेहमी आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक आणि कृतिशील राहून संवेदनशीलतेने जपणाऱ्या आमच्या मित्रास – शतशः प्रणाम!
*-प्राचार्य डॉ. प्रविण चौगले, कोल्हापूर* (संचालक तथा माजी प्राचार्य, डी. आर. माने महाविद्यालय, कागल)