*अरुण माने कुटुंबियांकडून बालकल्याणला २९ लाखांची मदत..!!*
मृत्यूनंतरची मानवसेवा : बालसंकुलातील मुला-मुलींच्या भवितव्यासाठी हातभार..
कोल्हापूर : येथील गुजरीतील प्रसिध्द कर सल्लागार कै. श्री.अरुण विठ्ठल माने यांनी मृत्यूपत्रात व्यक्त केलेल्या इच्छेनुसार २९ लाख रुपयांचा धनादेश शुक्रवारी येथील बालकल्याण संकुलास प्रदान करण्यात आला. श्री.अरुण विठ्ठल माने यांच्या कुटुंबियांच्यावतीने श्री.पांडुरंग पाटील व त्यांच्या पत्नी सौ.रागिणी पाटील यांनी हा धनादेश संस्थेचे अध्यक्ष जिल्हाधिकारी मा.अमोल येडगे यांच्याकडे जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या अनौपचारिक कार्यक्रमात सुपूर्द केला. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष व्ही.बी.पाटील, मानद कार्यवाह पदमजा तिवले उपस्थित होत्या.
श्री.अरुण विठ्ठल माने हे कोल्हापुरात तब्बल ४० वर्षे कर सल्लागार म्हणून काम करत होते. समाजऋण मानून काम करणारे ते व्यक्तिमत्व होते. त्यांना कोणतेच अपत्य नव्हते. पत्नी रेखा माने यांचे कोरोना काळात निधन झाले. तेव्हापासून त्यांनी आपली मालमत्ता समाजातील चांगले काम करणाऱ्या संस्थांच्या उपयोगी पडावी अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यांचे साडू श्री.पांडुरंग पाटील व कार्यालयीन सहकारी श्री.कृष्णात वीर यांच्याकडे त्यांनी त्यासंबंधीचे अधिकार दिले होते. संस्थेच्या मानद कार्यवाह पदमा तिवले यांच्याशी श्री.पांडुरंग पाटील यांचे जुने ऋणानुबंध असल्याने त्यांनी बालकल्याण संकुलास मदत करण्यास प्राधान्य दिले. श्री.अरुण विठ्ठल माने यांचे २६ फेब्रुवारी २०२२ ला निधन झाले. त्यानंतर सर्व प्रक्रिया करण्यासाठी कांही कालावधी गेला. पांडुरंग पाटील व कृष्णात वीर यांनी संपत्तीची विभागणी केल्यावर ती तपासण्यासाठी ॲड अजित कुलकर्णी यांची माने यांनीच नियुक्ती करून ठेवली होती. त्यानुसार ॲड कुलकर्णी व कृष्णात वीर हे बालकल्याण संकुलात गेले. त्यांनी संस्थेची पाहणी केली. या संस्थेत अनाथ निराधार, मुले-मुली व महिलांचे यांचे आयुष्य उत्तम पध्दतीने घडवले जात असल्याचे आणि आपण दिलेला पैसा तिथे योग्य कामासाठीच अत्यंत पारदर्शीपणाने वापरला जाणार असल्याचे पाहून त्यांना समाधान वाटले व याच संस्थेला निधी देण्याचा निर्णय त्यांनी सर्वानुमते घेतला. बालकल्याण संकुलातील एका कक्षास दिवंगत अरुण विठ्ठल माने यांच्या पत्नी दिवंगत रेखा माने यांचे नांव देण्यात येणार आहे. निधी प्रदान कार्यक्रमास ॲड- अजित कुलकर्णी, कृष्णात वीर हे उपस्थित होते.