आर या पारची लढाई समजून नंदाताईंच्या कामाला लागा
अंजनाताई रेडेकर यांचे प्रतिपादन
आजरा
हत्तीवड्याच्या पांढरीमध्ये जमलेल्या स्वाभिमानी शिलेदारांनो, भाजपाचे कारनामे उघड्या डोळ्यांनी बघत राहण्याची वेळ संपली आहे. आता आपली वेळ आली आहे. महायुतीचे भ्रष्ट सरकार हद्दपार केलेच पाहिजे. महाराष्ट्र धोक्यात आला आहे. ही लढाई विचारांची आहे, स्वाभिमानाची आणि सुखाने जगण्याची आहे. मनातील संभ्रम काढून टाका. आघाडीच्या उमेदवार डॉ. नंदिनी बाभुळकरांच्या विजयाला आर-पारची लढाई समजून कामाला लागा, असे आवाहन गोकुळच्या संचालिका अंजनाताई रेडेकर यांनी केले.
हत्तीवडे (ता. आजरा) येथे महाविकास आघाडीच्या आयोजित
सभेत त्या बोलत होत्या. रेडेकर पुढे म्हणाल्या, सतेज पाटील यांचा सांगावा घेऊन आले आहे.
काँग्रेसचा अजेंठा घेऊन आले आहे. आमच्या सोबत शिवसेना, राष्ट्रवादी आहे. या एकीच बळ डॉ. नंदिनी बाभुळकरांच्या विजयाचा रथ रोखू शकत नाही. आज ८५ वर्षांचे शरदचंद्रजी पायाला भिंगरी बांधून अख्खा महाराष्ट्र जागवत आहेत. पुरोगामी महाराष्ट्राला भाजप परवडणारी नाही. तरूणांनो विचारधारा असलेल्या पक्षाची मशाल हातात घ्या.
अंजनाताई म्हणाल्या, मी जिल्हा परिषद सदस्य असताना माझ्या मतदार संघाने ३६०० मतांचे लीड दिले आहे. आता सर्वांची एकत्र ताकद पाहता सात हजार मतांचे मताधिक्य आम्ही डॉ. बाभुळकर यांना निश्चित देणार आहे. यावेळी बोलताना शिवसेनेचे नेते प्रा. सुनील शिंत्रे म्हणाले, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना उत्तर प्रदेशमध्ये गंगा नदीत प्रेतं वाहत होती. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राला वाचवले.
यावेळी बोलताना डॉ. बाभुळकर म्हणाल्या, महाराष्ट्र गुजरातला विकायचा की महाराष्ट्र वाचवायचा. स्वाभिमानाने जगायचे की दिल्लीत गुडघे टेकायचे. हे मतदारांनी ठरवावे. तालुक्याला गद्दारीचा कलंक लागला आहे. तो धुऊन काढायचा आहे. यावेळी अमर चव्हाण, विष्णुपंत केसरकर, अर्चना मुकुंद देसाई, युवराज पवार आदी उपस्थित होते.