आंतरविद्याशाखीय अभ्यासातून समग्रतेचा शोध शक्य – डॉ. दिलीप चव्हाण
कोल्हापूर
‘आंतरविद्याशाखीय अभ्यास ही जगभर प्रचलित झालेली व मान्यता पावलेली अभ्यासप्रणाली आहे. भाषा आणि साहित्याचा संबंध अनेक विषयांशी, घटकांशी येतो. त्यामुळे भाषा आणि साहित्याचा अभ्यास आंतरविद्याशाखीय दृष्टीने केल्यास तो अधिक परिपूर्ण, समग्र व मूलगामी होईल. आंतरविद्याशाखीय अभ्यास म्हणजे दोन किंवा अधिक विषयातील परस्परसंबंध उलगडून दाखवणे नव्हे, तर वर्तमान मांडणीची नव्याने पुनर्मांडणी करणे होय . त्यासाठी वर्तमान व्यवस्थेला सतत प्रश्न विचारावे लागतील. व्यवस्थेला प्रक्षांकित करुनच आपण आंतरविद्याशाखीयतेकडे जाऊ शकतो’ असे मत स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठातील भाषा, साहित्य आणि संस्कृती अभ्यास संकुलाचे प्रमुख डॉ. दिलीप चव्हाण यांनी व्यक्त केले.
शिवाजी विदयापीठ कोल्हापूर, शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघ आणि मराठी विभाग, नाइट कॉलेज ऑफ आर्टस अॅण्ड कॉमर्स कोल्हापूर यांच्या वतीने आयोजित ‘भाषा आणि साहित्याभ्यासाचे आंतरविद्याशाखीय स्वरुप’ या विषयावरील दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राच्या उद्घाटनप्रसंगी उद्घाटक व बीजभाषक म्हणून डॉ. दिलीप चव्हाण बोलत होते. उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी कौन्सिल ऑफ एज्युकेशनच्या अध्यक्षा सौ. रजनीताई मगदूम होत्या. याप्रसंगी कौन्सिल ऑफ एज्युकेशनचे संचालक अॅड. अमित बाडकर, ‘शिविम’चे अध्यक्ष डॉ भरत जाधव, सचिव डॉ. मांतेश हिरेमठ, अधिवेशनाध्यक्ष डॉ. गोपाळ गावडे, डॉ. नंदकुमार मोरे, डॉ. रणधीर शिंदे, प्राचार्य डॉ . उत्तम पाटील, चर्चासत्राचे निमंत्रक व मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ . अरुण शिंदे, समन्वयक डॉ .नंदकुमार कुंभार आदी उपस्थित होते . यावेळी ‘शिविम’च्या साहित्य पुरस्कारांचे वितरण, गुणवंत प्राध्यापक व विद्यार्थ्यांचा सत्कार केला गेला.
उद्घाटन समारंभाचे प्रमुख पाहुणे, कौन्सिल ऑफ एज्युकेशनचे सचिव डॉ. विश्वनाथ मगदूम यांनी, विविध क्षेत्रांमध्ये सुरु असलेल्या आंतरविद्याशाखीय संशोधनाचा परामर्श घेतला. आगामी काळात कृत्रिम बुद्धिमत्तेचे भाषा आणि साहित्यासमोर मोठे आव्हान उभे ठाकणार आहे, त्याला सामोरे जाण्याचा विचारविमर्श प्राध्यापकांनी करावा असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ. रजनीताई मगदूम यांनी चर्चासत्रास शुभेच्छा दिल्या. ‘शिविम’ च्या चौदाव्या अधिवेशनाचे अध्यक्ष डॉ. गोपाळ गावडे यांनी मराठी भाषा आणि साहित्यासमोर उभ्या असणाऱ्या आव्हानांची चर्चा केली.
डॉ. दिलीप चव्हाण यांनी आपल्या बीजभाषणामध्ये आंतरविद्याशाखीयतेची संकल्पना स्पष्ट करून भाषा आणि साहित्याच्या आंतरविद्याशाखीय अभ्यासाचे स्वरुप विशद केले. डॉ. रघुनाथ कडाकणे यांनी भाषा, साहित्यामधून संस्कृती अभ्यास कसा करता येतो, यावर मांडणी केली. डॉ. बाळासाहेब गणपाटील यांनी प्राकृत, महाराष्ट्री, अपभ्रंश, मराठी यांचा अनुबंध उलगडत मराठी भाषेची पूर्वपरंपरा मांडली. सारिका उबाळे यांनी भाषेमधून लिंगभाव कसा व्यक्त होत असतो, हे उदाहरणांसह मांडले. डॉ . उदय पाटील यांनी कृत्रिम बुध्दिमत्तेचा भाषा, साहित्यावरील परिणाम यांचे विवेचन केले .
डॉ . अवनीश पाटील यांनी, अलीकडे मानवी स्मृतींना कसे घडविले जात आहे व स्मृती म्हणजेच इतिहास असा समज कसा पसरविला जात आहे, या संदर्भात मांडणी केली. डॉ. शरद भुताडिया यांनी ‘भाषा, साहित्य आणि नाट्यशास्त्रांतील परस्परसंबंध उलगडून दाखवला. डॉ. माया पंडित यांनी आधुनिकता, उत्तरआधुनिकता, स्त्रीवाद, पर्यावरणवाद वगैरे विचारप्रवाहांच्या परिप्रेक्ष्यामधून साहित्याभ्यास कसा करावा, याचे विश्लेषण केले.
ह.भ.प ज्ञानेश्वर बंडगर (वारकरी चळवळीच्या सामाजिक सांस्कृतिक अभ्यासाच्या नव्या दिशा), संपत देसाई (सामाजिक चळवळी आणि साहित्य), श्रीराम मोहिते (साहित्य आणि ललितकला), फारुक काझी (बालसाहित्याचा मानसशास्त्रीय अभ्यास), डॉ .संजय साठे (कलाकृतीचे माध्यमांतर), डॉ. गौतम काटकर (ताम्रपट, शिलालेखांचा भाषिक अभ्यास), डॉ. सुखदेव एकल (लोकविद्या आणि लोकसंस्कृती), डॉ . महेश गायकवाड (साहित्य आणि विज्ञान) यांनी शोधनिबंधांचे वाचन केले.
ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य डॉ . सुनीलकुमार लवटे हे समारोप समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. डॉ लवटे यांनी फिनलंडच्या धर्तीवरील शिक्षणाची गरज व्यक्त केली. कौन्सिल ऑफ एज्युकेशनचे सचिव डॉ. विश्वनाथ मगदूम अध्यक्षस्थानी होते. यावेळी शिविमच्या विविध परितोषिकांचे वितरण करण्यात आले. चर्चासत्रासाठी अडीचशेहून अधिक प्राध्यापक व संशोधक उपस्थित होते.
—————————————————————————————————————-
फोटो ओळी
‘भाषा आणि साहित्याभ्यासाचे आंतरविद्याशाखीय स्वरुप’ या विषयावरील राष्ट्रीय चर्चासत्राच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना डॉ . दिलीप चव्हाण, विचारपीठावर कौन्सिल ऑफ एज्युकेशनच्या अध्यक्षा सौ रजनीताई मगदूम, प्रमुख पाहुणे डॉ . विश्वनाथ मगदूम, संचालक ॲड . अमित बाडकर, प्राचार्य डॉ .उत्तम पाटील मराठी विभाग प्रमुख प्रा .डॉ . अरुण शिंदे, शिविम चे अध्यक्ष डॉ . भरत जाधव, डॉ. मांतेश हिरेमठ डॉ. गोपाळ गावडे, डॉ .नंदकुमार मोरे डॉ रणधीर शिंदे, डॉ नंदकुमार कुंभार आदी