अमल महाडिक यांनी दाखल केला शक्तिप्रदर्शनाने अर्ज
विरोधकावर केला हल्लाबोल
कोल्हापूर,
‘दक्षिण विधानसभेच्या जनतेची आमदारांनी फसवणूक केली. पाच वर्षांत त्यांनी विकासाची कोणतीच कामे केलेली नाहीत. राजकारण हा त्यांच्यासाठी व्यवसाय आहे, पण आमच्यासाठी हा वारसा आहे,’ अशी टीका माजी आमदार अमल महाडिक यांनी केली. भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात त्यांनी आज कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. त्यानंतर हत्यांनी करवीर प्रांताधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज भरला. यावेळी खासदार धनंजय महाडिक, ‘गोकुळ’च्या संचालिका शौमिका महाडिक, माजी खासदार संजय मंडलिक, प्रा. जयंत पाटील, भाजप प्रदेश सचिव महेश जाधव उपस्थित होते. दरम्यान, शौमिका महाडिक यांनीही दक्षिण विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला आहे.
मेळाव्यात अमल महाडिक म्हणाले, ‘कार्यकर्ते ही माझी ऊर्जा आहे. याच ऊर्जेच्या बळावर मी पराभूत होऊनही पाच वर्षे कार्यरत राहिलो. विद्यमान आमदारांनी दक्षिणच्या जनतेची फसवणूक केली. केवळ राजकारण करून त्यांनी लोकांना फसवले. मात्र, आता या मतदारसंघात परिवर्तन घडवायचे आहे. यासाठी आपल्याला तयार राहायला पाहिजे. विरोधकांकडून खोटे बोल पण रेटून बोल ही निती अवलंबली जाते. त्यांच्या खोट्याला आपण महायुती सरकारने केलेल्या कामाची माहिती सांगून उत्तर देऊ या. समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याची भूमिका महायुती सरकारने योजनांच्या माध्यमातून पार पाडली आहे. मी आमदार नसतानाही या मतदारसंघात १५० कोटींचा निधी आणला. त्यातून अनेक विकासकामे झाली. दक्षिण विधानसभा मतदारसंघात वारे बदले असून आपला विजय निश्चित आहे.’
प्रा. जयंत पाटील म्हणाले, ‘राजकारण हा माझा व्यवसाय आहे असे विरोधी नेत्याने सांगितले. पैसा ओतायचा आणि पैसा मिळवायचा हीच त्यांनी नीती आहे. राजकारणाचा व्यवसाय करणाऱ्या प्रवृत्तीला हद्दपार करा.’
यावेळी सत्यजित कदम, जिल्हाध्यक्ष विजय जाधव, राष्ट्रवादीकाँग्रेस (अजित पवार गट) शहराध्यक्ष आदिल फरास, अशोक देसाई, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सिद्धार्थ घोडेराव, महिला मोर्चा अध्यक्ष रुपाराणी निकम, डॉ. सदानंद राजवर्धन, जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, माजी नगरसेवक अजित ठाणेकर, विजय खाडे-पाटील, विजय सूर्यवंशी, दिलीप मैत्राणी यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.