घराणेशाही, सत्ता आणि संपत्तीचा वापर करून जनतेची दिशाभूल
माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांचा आरोप
तारदाळ – इचलकरंजी तालुक्यातील तारदाळ येथे सोमवारी आयोजित जाहीर सभेत माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी सत्ताधारी आमदार प्रकाश आवाडे यांच्यावर गंभीर आरोप करताना त्यांना घराणेशाही, सत्ता आणि संपत्तीचा वापर करून जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप केला. ढोबळे म्हणाले की, “आमदार आवाडे यांनी गेल्या वीस वर्षांत इचलकरंजी परिसरात केवळ घराणेशाही राजकारण करून सामान्य जनतेची लूट केली आहे. सत्ता आणि संपत्तीच्या जोरावर त्यांनी भारतीय जनता पक्षालाही विकत घेतले आहे.”
माजी मंत्री ढोबळे यांनी आवाडे यांच्यावर जमिनी हडप करून त्यावर शैक्षणिक संस्था उभारण्याचे आरोप केले. “आवाडे यांनी जनतेच्या हक्काच्या जमिनींवर अतिक्रमण करून त्याचा गैरवापर करत अनेक संस्था उभ्या केल्या, यामुळे सामान्य जनतेला लुटण्याचे कार्य त्यांनी केले आहे,” असे ढोबळे म्हणाले. त्याचवेळी त्यांनी मतदारांना महाविकास आघाडीचे उमेदवार मदन कारंडे यांना प्रचंड मताधिक्य देऊन परिवर्तन घडविण्याचे आवाहन केले.
इचलकरंजीतील राजकारणातील आर्थिक गैरव्यवहारांवर बोलताना हिंदुराव शेळके यांनीही आवाडे यांच्यावर आरोप केले. ते म्हणाले की, “आवाडे यांनी इचलकरंजीतील अनेक बँकांची आर्थिक स्थिती खालावली आहे. चाळीस वर्षे सत्ता असूनही त्यांच्याकडे स्वतःच्या मालकीची गाडी नसल्याचे सांगत त्यांनी मतदारांची दिशाभूल केली आहे.”
या सभेत माजी आमदार राजीव आवळे, स्मिता तेलनाडे, शरद कांबळे, भाऊसाहेब कसबे, नितिन कोकणे, बजरंग लोणारी, यासिन मुजावर यांनीही प्रकाश आवाडे यांच्या विरोधात आपले विचार व्यक्त केले. राजीव आवळे म्हणाले, “आमदार आवाडे यांची सत्ता लोकांच्या हिताऐवजी त्यांच्या स्वतःच्या हितासाठी आहे. हे बदलणे आवश्यक आहे.”
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सागर नाईक यांनी केले तर सूत्रसंचालन विश्वनाथ मांजरे यांनी केले. यावेळी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि महिलांसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.