: पुस्तक परिचय / परीक्षण: —
सर्वांगसुंदर आरोग्याची सप्तपदी
:‘आपले मन, शरीर व बुद्धिमत्ता संतुलित आणि निरोगी ठेवणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे,’ तसेच ‘प्रभाव दमदार असण्यापेक्षा स्वभाव इतरांसाठी दिलदार असावा.. हीच माणसातल्या माणुसकीची खासियत आहे, असे गौतम बुद्धांनी सांगितलं आहे.
‘योग’ या शब्दाचा अर्थ जोडणे, बांधणे, एकत्र आणणे, जुळविणे असा होतो. शरीर, मन व आत्म्याला सृष्टीशी जोडणारे, व्यक्तीला व्यक्तीशी जोडणारे, बाह्यरंगाला अंतरंगाशी जोडणारे ते योगशास्त्र. या शास्त्राच्या माध्यमातूनच आपले कुटुंबीय, सोबती व विश्वातील सर्वजण सक्षम आणि बलशाली व्हावेत, हा शुद्ध हेतू समोर ठेवून वसंत रामचंद्र सुतार यांनी ‘स्वयं दृष्टिकोन विकास कार्यक्रम’ (SVDP)पुस्तिका साकारली आहे.
शारीरिक, मानसिक व बौद्धिक सक्षम विकास होण्यासाठी परिपूर्ण व्यायाम गरजेचा आहे. त्यातून शरीर लवचिक व सदृढ होण्यास मदत होते.
स्वच्छतासेवा मानसिक सबलीकरणासाठी, तर शवासन ध्यान संतुलन व चैतन्यासाठी सत्संग आणि गीत संगीत समाविष्ट केले आहे.
बौद्धिक व्यक्तिमत्त्व विकासासाठी ऐकून घेणे किती महत्त्वाचे आहे, याबाबत सरळ, सोप्या भाषेत ही पुस्तिका मार्गदर्शन करते.
स्वतःने स्वतःसाठी स्वतः तयार केलेला रोज दोन-अडीच तास चालणारा सात दिवसांचा कोर्स सर्वांसाठीच उपयुक्त असून, त्याचा दिनक्रम या पुस्तिकेत आहे.
डोक्यापासून ते तळपायपर्यंत सर्व अवयव लवचिक व सक्षम करण्यासाठी करावयाच्या हालचाली तसेच उभे राहून, बसून झोपून करावयाचे सर्व व्यायाम प्रकार सूर्यनमस्कार, प्राणायाममध्ये बस्रिका, कपालभाती अनुलोमविलोम, (नाडीशोधन ), शीतली, भ्रमरी तसेच मुद्रा प्राणायाम बाबतही माहिती दिली आहे.
शवासन, ध्यान, स्वच्छता सेवा, व्यसनमुक्ती, यांबाबत मार्गदर्शन आहे.
पृथ्वी, पाणी, वायू, अग्नी, आकाशातचा आपल्या जडणघाडणीवर होणारा परिणाम, आपले कार्यकर्तव्य याची माहिती दिली आहे.
दिनचर्या कशी असावी याचीही माहिती ही पुस्तिका देते. व्यायाम, ध्यानासोबत आहार कोणता, कसा आणि कधी घ्यावा, याबाबतही ऊहापोह केला आहे.
सप्तचक्र शुद्धिक्रियाबाबत साधे सोपे स्पष्टीकरण दिले आहे.
चित्रांच्या समावेशाने प्रात्यक्षिकही सोपे होण्यास मदत होते. स्वयं दृष्टिकोन विकासासाठी उपयुक्त नियम माहिती तसेच योग, प्राणायाम, ध्यान व अध्यात्माबाबत उदाहरणे व सचित्र वर्णन असणारी ही मार्गदर्शक पुस्तिका घरोघरी असावी अशीच आहे.
पुस्तकाचे नाव : स्वयं दृष्टिकोन विकास कार्यक्रम (S. V. D. P.)
लेखक : वसंत रामचंद्र सुतार
प्रकाशक : हृदय प्रकाशन, पोहाळे
पृष्ठ : ८० मूल्य : रु. १५०
संपर्क 02312672126/ 9371100659