अखिल भारतीय होमिओपॅथी संस्थेची स्थापना कोल्हापूरात होण्यासाठी प्रयत्न करणार
खासदार धनंजय महाडीक
कोल्हापूर : अखिल भारतीय होमिओपॅथी संस्थेची स्थापना कोल्हापूर येथे करणेसाठी केंद्र सरकार कडे पाठपुरावा करणार असे प्रतिपादन खासदार धनंजय महाडीक यांनी होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज एक्स स्टुडंटस् असोसिएशन (होमेसा) ने आयोजित केलेल्या ‘होमेसाकॉन २०२५’ या परिषदेच्या ऑनलाईन उद्घाटन प्रसंगी केले. परिषद होमिओपॅथिक वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालय, ताराराणी चौक, कोल्हापूरच्या सभागृहातमध्ये संपन्न झाले.
होमिओपॅथी या प्राचीन पध्द्तीव्दारे उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोवीडच्या काळामध्ये होमिओपॅथीव्दारे अनेक रूग्णांवर यशस्वी उपचार केले. देशातील पहिल्या सार्वजनिक होमिओपॅथीक दवाखाना राजर्षी शाहू महाराज यांनी १८९८ मधे सुरू करून देशात प्रथम सार्वजनिक आरोग्य सेवेत होमिओपॅथीचा समावेश केला. भौगोलिक दृष्ट्या कोल्हापूर हे महाराष्ट्र, कर्नाटक व गोवा या राज्यांच्या केंद्रस्थानी आहे. यास्तव येथे अखिल भारतीय स्तरावरील होमिओपॅथी संशोधन संस्था सुरू होणे गरजेचे आहे. होमिओपॅथी शिक्षण व उपचारांच्या बाबतीत कोल्हापूर पूर्वीपासूनच आघाडीवर राहिले आहे. या संस्थेमुळे संशोधनाला ही चालना मिळेल. लवकरच केंद्रिय आयुष मंत्री यांच्याकडे प्रस्ताव सादर करणार असल्याचे ही ते म्हणाले.
परिषदेत दिल्ली येथील राष्ट्रीय होमिओपॅथी आयोगाचे सदस्य डॉ. मंगेश जतकर यांनी “भारतीय आरोग्य सेवेत होमिओपॅथीचा प्रभावी वापर ” या विषयावर बोलताना म्हणाले. जागतिक आरोग्य संघटनेचे घोषवाक्य “माझे आरोग्य माझा हक्क’ सत्यात उतरवायचे असल्यास आपल्या देशामध्ये सार्वत्रिक आरोग्य सेवेमध्ये होमिओपॅथीच्या अंर्तभाव प्रभावीपणे करावा लागेल. शासनाच्या प्राथमिकआरोग्यसेवेपासूनच जर होमिओपॅथीचा अंर्तभाव केल्यास दैनंदिन बाह्य रूग्ण विभागातील रूग्णांना अल्प खर्चामध्ये उपचारांचा पर्याय उपलब्ध होऊ शकेल.
पारंपारिक उपचार पध्दतीनंतर होमिओपॅथीचाच वापर जागतिक स्तरावर होत आहे. होमिओपॅथीचा सार्वत्रिक आरोग्य सेवेमध्ये पारंपारिक उपचार पध्दती सोबत अंर्तभाव केल्यास सार्वजनिक आरोग्य सेवा जलद गतीने कार्यान्वित होऊन समाजाच्या सर्व घटकापर्यंत पोहचेल याकरिता होमिओपॅथी डॉक्टर्स व होमिओपॅथिक औषधे सहजरित्या उपलब्ध होणे अनिवार्य आहे. जेणेकरून होमिओपॅथी औषधप्रणालीचा फायदा सर्व जनतेस होईल असेही डॉ. जतकर म्हणाले.
डॉ. राहुल जोशी (मुंबई) यांनी ” मानसिक आरोग्यासाठी होमिओपॅथी” या विषयावर बोलताना होमिओपॅथी औषधप्रणाली नुसार रूग्णांची माहिती कशा प्रकारे घ्यावी याचे सविस्तर मार्गदर्शन केले, त्यांनी दैनंदिन किंवा सतत उद्भवणाऱ्या आजारांपासून ते दीर्घमुदतीच्या आजारावरती अद्ययावत होमिओपॅथीक उपचारासंबंधी विवेचन केले.
प्राचार्य डॉ. रोझारिओ डिसोझा यांनी “वैद्यकिय व्यवसायिकांसाठी नविन नियमावली” या विषयावर तर डॉ. प्रशांत तांबोळी (मुंबई) यांनी “होमिओपॅथिचा संशोधन विकास” मार्गदर्शन केले. याशिवाय डॉ. संतोष रानडे, डॉ. सपना शहा, डॉ. श्रेयस पांचाळ, डॉ. मंदार कुंटे आदींची व्याख्याने झाली.
याप्रसंगी कोल्हापूरातील जेष्ठ होमिओपॅथी तज्ञ डॉ. रविकुमार गजानन जाधव यांना होमिओपॅथी क्षेत्रातील अमुल्य योगदानाबद्दल डॉ. हॅनिमन जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित केले.
प्रारंभी होमेसा प्रेसिडेंट डॉ. राजकुमार पाटील यांनी सर्वांचे स्वागत करून असोसिएशन मार्फत राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. परिषदेच्या संयोजक सचिव डॉ. सुनेत्रा शिराळे यांनी प्रास्ताविकामध्ये “होमिओपॅथीव्दारे माझे आरोग्य, माझा हक्क’ या परिषदेच्या संकल्पनेबाबत सविस्तर माहिती दिली. सचिव डॉ. राजेश कागले यांनी आभार मानले.
परिषदेसाठी डॉ. मंदार कुंटे, डॉ. हिम्मतसिंह पाटील, डॉ. जितेंद्र वीर, डॉ. अन्वर गंजेली, डॉ. अजय हनमाने, डॉ. सचिन मगदुम, डॉ. दिपकलडगे, डॉ. सुनिल औधकर, डॉ. संजय केटकाळे सुमारे ४०० होमिओपॅथ्स उपस्थित होते. तर जवळपास १००० होमिओपॅथ्सनी ऑनलाईन उपस्थिती दर्शविली.