*अखेर ऋतुराज क्षीरसागरांचा “पण” पूर्ण, शपतविधीनंतर शिवसैनिकांनी बांधला विजयाचा फेटा*
कोल्हापूर दि.०७ : कोल्हापूर उत्तर विधानसभेत राजेश क्षीरसागर यांच्या विजयाच्या रूपाने शिवसेनेचा भगवा पुन्हा डौलाने फडकत नाही तोपर्यंत “फेटा” न बांधण्याचा निर्धार युवासेना पश्चिम महाराष्ट्र सचिव ऋतुराज क्षीरसागर यांनी २०१९ च्या निवडणुकीनंतर केला होता. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत उत्तर मधून राजेश क्षीरसागर यांनी तब्बल २९ हजाराहून अधिक मतांनी विजय संपादित केला. आज नूतन आमदार राजेश क्षीरसागर यांनी विधिमंडळात “आमदारकीची” शपत घेतली. या शपतविधीनंतर शिवसैनिकांनी ऋतुराज क्षीरसागर यांना विजयाचा फेटा नेसवला आणि अखेर ऋतुराज क्षीरसागर यांनी फेटा न बांधण्याचा आपला पाच वर्षाचा “पण” सोडला.
यावेळी बोलताना युवासेना पश्चिम महाराष्ट्र सचिव ऋतुराज क्षीरसागर यांनी, २०१९ चा पराभव अत्यंत जिव्हारी लागणारा होता. परंतु, जनसेवेचे बाळकडू मिळाले असल्याने पराजयाने खचून न जाता येणाऱ्या काळास खंबीरपणे सामोरे जाण्याचा निश्चय आम्ही कुटुंबाने केला होता. त्यागाशिवाय ध्येय निश्चितीला बळ मिळत नाहीत त्यामुळे शिवसेनेचे आमदार म्हणून राजेश क्षीरसागर विधिमंडळात शपत घेतील तेव्हांच डोक्याला “फेटा” बांधण्याचा निर्धार केला होता. समस्त कोल्हापूर वासियांनी या निवडणुकीत राजेश क्षीरसागर यांना दिलेले प्रेमरुपी आशीर्वाद विजयी मताधिक्यातून दिसून आले आहेत. या विजयात दिवसरात्र कष्ट केलेल्या शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी मित्रपक्ष महायुती पदाधिकारी, शिवसैनिक, कार्यकर्ते, हितचिंतक, मित्र मंडळी, लाडक्या बहिणी, तालीम संस्था मंडळे, समाज आदी सर्वच घटकांचे आभार यावेळी ऋतुराज क्षीरसागर यांनी मानले.
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख रणजीत मंडलिक, किरण अतिग्रे, विभागप्रमुख शेखर चौगुले, यशवंत टिपुगडे, निखील बोडके, विकास पायमल, साई चौगुले, प्रवीण सूर्यवंशी, अवधूत टिपुगडे, सिद्धेश पाटील आदी शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते.