अखेर चित्रपट महामंडळात रंगला तिळगुळ घ्या गोड बोला
तीन वर्षाच्या संघर्षानंतर समझोता
कोल्हापूर
तीन वर्षात अखिल भारतीय मराठी चित्रपट संचालक मंडळात झालेल्या प्रचंड संघर्षानंतर अखेर गोडवा निर्माण झाला. सभासदांच्या हितासाठी एकत्र येण्याचा निर्णय घेत सत्ताधारी व विरोधकांनी तीळ गुळ घ्या गोड बोला म्ह्णत समझोता केला. कोल्हापुरात झालेल्या संचालकांच्या बैठकीत यापुढे संघर्ष न करता महामंडळ आणि सभासदांच्या हक्कासाठी एकत्र येण्याचे ठरले. अध्यक्षस्थानी महामंडळाचे अध्यक्ष मेघराज भोसले होते.
मराठी चित्रपट महामंडळात प्रचंड संघर्ष सुरू होता. वादावादी, अविश्वास ठराव, बैठकच न घेणे, दोन गटाकडून निवडणूक जाहीर करणे अशा घटनामुळे तमाशा निर्माण झाला होता. तो थांबविण्यासाठी काही दिवस हालचाली सुरू होत्या. बाबा पार्टे व इतरांनी यामध्ये पुढाकार घेतला. यानुसार बुधवारी संचालकांची बैठक झाली. अकरापैकी चार संचालक उपस्थित होते. इतर पाच संचालकांनी आपण घ्याल तो निर्णय मान्य असल्याचे लेखी पत्र दिले. दोन संचालकांचे सभासदत्व रद्द झाल्याने त्यांना बैठकीस निमंत्रित करण्यात आले नव्हते.
अध्यक्ष भोसले, उपाध्यक्ष धनाजी यमकर, रणजीत जाधव व संजय डुबे या संचालकासह बाबा पार्टे, आकाराम पाटील, महेश पन्हाळकर व दोन्ही गटाचे वकिल उपस्थित होते. महामंडळातील वाद मिटवून लवकर निवडणुका कशा घेता येतील, न्यायालतील खटले कसे मागे घेता येतील याबाबरच इतर विषयावर चर्चा झाली. यापुढे सर्वांनी मिळून काम करण्याचे ठरले. एकमेकांना तिळगूळ देत वाद संपल्याची घोषणा करतानाच यापुढे गोड गोड बोलत काम करू असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.