एअरपोर्ट क्रॅश फायर टेंडरचा
अग्नीशमन पंप मेड इन कोल्हापूर
फायर फ्लाय फायर पंम्प्स् प्रा. लि. ची गरूड भरारी
“
कोल्हापूर
विमानतळावरील सुरक्षेसाठी जगभर वापरल्या जाणाऱ्या एअरपोर्ट क्रॅश फायर टेंडरचा अतिशय महत्त्वाचा असलेला अग्नीशमन पंप हा कोल्हापुरात तयार करण्यात येत आहे. फायर फ्लाय फायर पंम्प्स् प्रा.लि. या कंपनीने यामध्ये घेतलेली गरूड भरारी निश्चितच कौतुकारस्पद आहे. कोल्हापूरसह देशभरातील साठ विमानतळावरील अग्नीशमन वाहनात कोल्हापूरच्या या कंपनीचे पंप बसविण्यात आले आहेत.
कोल्हापूर विमानतळावर नुकतेच साडेसात कोटी रुपयांचे अग्निशमन वाहन दाखल झाले आहे. दुबईमधून हे अग्निशमन वाहन कोल्हापूर विमानतळावर आणले आहे. पण, या वाहनासाठी जे अग्नीशमन पंप लागतो, तो कोल्हापुरात तयार केला आहे. दुबईतील नॅफको या कंपनीने हे वाहन तयार केले आहे. त्यासाठी कोल्हापुरातील फायर फ्लाय फायर पंम्प्स् प्रा.लि. या कंपनीचा वाटा अतिशय महत्त्वाचा आहे. गेल्या तेवीस वर्षापासून कार्यरत असलेल्या या कंपनीमार्फत अशा साठ वाहनासाठी पंप उपलब्ध करून दिले आहेत.
याबाबत कंपनीचे राजेंद्र माळी यांनी सांगितले की, मिनिटाला ६ हजार लिटर पाणी फवारण्याच्या क्षमतेचे हे वाहन शंभर मीटर अंतरापर्यंत पाण्याचा मारा करुन आग विझवू शकते. ज्या गतीने विमान पळू शकते, त्या गतीने पळण्याची व पाणी फेकण्याची क्षमता या वाहनामध्ये आहे. कंपनीने तयार केलेले असे पंप देशभरातील साठ विमानतळावर असलेल्या अग्नीशमन वाहनात बसविण्यात आले आहेत. पूर्वी हे पंप केवळ युरोप किंवा अमेरिकेमध्ये तयार केले जात होते. पण, त्यांची मक्तेदारी मोडण्याचे काम कोल्हापूरने केले. याशिवाय दरातही प्रचंड तफावत आहे. विक्री पश्चात सेवा सुलभपणे मिळत असल्याने याला देशभरात मोठी मागणी आहे.
ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर योजना व मेक इन इंडिया योजनेमुळे हे पंप भारतात तयार करण्याची संधी मिळाली. विमानतळ प्राधिकरणाकडून त्याला मान्यता मिळाली. भारतीय बनावटीच्या या पंपाला केवळ देशात नव्हे तर जगभरात मागणी आहे. दुबईतील नॅफको कंपनीला आम्ही प्रथम हा पंप बनवून दिला, तो त्यांना पसंत पडला. तेव्हापासून या कंपनीच्या वतीने तयार केले जाणाऱ्या सर्व वाहनात मेड इन कोल्हापूरचाच पंप वापरला जातो. कंपनीच्या वतीने अग्नीशमन वाहनासाठी वापरले जाणारे सर्व प्रकारचे पंप तयार केले जातात. साठ देशात त्याची निर्यात होते. दरवर्षी किमान हजारावर पंप तयार केले जातात.
कोल्हापूर विमानतळावर दाखल झालेल्या एअरपोर्ट क्रॅश फायर टेंडर या नव्या वाहनाचे खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. साडेसात कोटी रुपये किमतीच्या या वाहनाची क्षमता ६ हजार लिटर पाणी, ८०० लिटर फोम आणि २०० किलो ड्राय केमिकल पावडर साठवण्याची आहे. आगीची वर्दी मिळताच पहिल्या २५ सेकंदात हे वाहन प्रतितास ८० किलोमीटरचा वेग गाठते आणि ७० मीटर अंतरापर्यंत पाण्याचा मारा करुन, आग विझवू शकते. त्यामध्ये तयार केलेला पंप कोल्हापूरच्या या कंपनीने बनवला आहे.