दारू विक्रीचा परवाना देतो म्हणून कोटीची फसवणूक
अप्पर पोलिस अधीक्षकास अटक
म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
दारू विक्रीचा परवाना देतो असे सांगून हॉटेल व्यवसायिकाची एक कोटी पाच लाखाची फसवणूक करणाऱ्या अप्पर पोलिस अधीक्षकास गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली. श्रीकांत नामदेव कोल्हापुरे असे याचे नाव असून तो गुन्हे अन्वेषण पुणे विभागात कार्यरत होता.
गुन्हे अन्वेषण कोल्हापूर परिक्षत्राच्या पोलिस अधीक्षक मनिषा दुबुले यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोल्हापुरे हा सीआयडी पुणे विभागात कार्यरत होता. महाबळेश्वर येथील एका हॉटेल मालकास दारू परवाना देतो असे सांगून त्यासाठी अडीच कोटी रूपयांची मागणी केली. त्याच्याकडून एक कोटी चेकने व पाच लाख रूपये रोख घेतले. नंतर हे काम केले नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर संबंधित हॉटेल मालकाने पोलिसात धाव घेतली. त्यानुसार या प्रकरणाचा तपास केला. यामध्ये कोल्हापुरे हा दोषी असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यास अटक करण्यात आली. त्याला अटक करण्यासाठी अनेक पथके तयार करण्यात आली होती. त्याला ठाणे येथे पकडण्यात आले.
दरम्यान, याच प्रकरणात हनुमंत मुंडे ,अभिमन्यू देडगे व बाळू पुरी यांना यापूर्वीच अटक केली आहे. या गून्ह्याच्या तपासासाठी अप्पर पोलिस महासंचालक प्रशांत बुरडे, पोलिस उपमहानिरीक्षक बसवराज तेली यांचे मार्गदर्शन लाभले.