आयटी पार्कला तत्वतः मंजुरी,पर्यायी जागा दहा दिवसात सुचवा -उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश*

Spread the news

  • *आयटी पार्कला तत्वतः मंजुरी,पर्यायी जागा दहा दिवसात सुचवा -उपमुख्यमंत्री अत पवार यांचे निर्देश*

कोल्हापुरातील हजारो तरुण-तरुणी पुणे, बेंगलोर, हैदराबाद इथल्या आयटी कंपन्यांमध्ये विविध पदांवर कार्यरत आहेत. कोल्हापुरातील हे ब्रेन ड्रेन रोखण्यासाठी कोल्हापुरातच सुसज्ज आयटी पार्क निर्माण करावे अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे.गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या कोल्हापुरातील आयटी पार्क साठी शेंडा पार्क येथील 35 हेक्टर जागा एमआयडीसी कडे हस्तांतरित करण्याची मागणी आमदार अमल महाडिक यांनी माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांच्याकडे केली होती. या मागणीचा सातत्याने पाठपुरावा महाडिक यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडेही केला होता. याचाच परिपाक म्हणून काही दिवसांपूर्वी कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेंडा पार्क येथील कृषी विभागाची 35 हेक्टर जागा एमआयडीसी कडे हस्तांतरित करण्याच्या सूचना दिल्या होत्या. कृषी विभागाला पर्यायी जागा म्हणून सांगरूळ येथील 50 हेक्टर जागा निवडण्यात आली होती. पण या जागेवरील निर्वनीकरणासाठी केंद्रीय पर्यावरण मंत्रालय आणि वनविभागाच्या परवानग्यांमध्ये बराच काळ जाण्याची शक्यता असल्याने अन्य पर्याय सुचवण्याची मागणी आमदार महाडिक यांनी उपमुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली होती. त्या अनुषंगाने आज जिल्हाधिकारी कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समवेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक झाली. या बैठकीला पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ कृषिमंत्री माणिकराव कोकाटे,विभागीय कृषी आयुक्त यांनी व्हिसीद्वारे उपस्थिती लावली.
या बैठकीत पुन्हा आमदार अमल महाडिक यांनी कोल्हापुरातील आयटी पार्क लवकरात लवकर होण्यासंदर्भात मुद्दा उपस्थित केला. सांगरूळ येथील जागेबाबत प्रश्न उपस्थित झाल्याने जिल्ह्यातील राज्य शासनाच्या मालकीच्या अन्य जागांची चाचपणी करण्यात यावी अशी मागणी महाडिक यांनी केली. याला सकारात्मक प्रतिसाद देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दहा दिवसात करवीर, राधानगरी, हातकणंगले आणि कागल तालुक्यातील शासकीय जमिनीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना दिले.
कृषी क्षेत्राबरोबरच औद्योगिक क्षेत्रालाही चालना मिळणे आवश्यक आहे त्यामुळे कृषी विभागाने सहकार्य करावे असे आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केले.
कृषी विभागाला दिल्या जाणाऱ्या पर्यायी जमिनीमध्ये जाण्यासाठी रस्ते तसेच अन्य सोयीसुविधा जिल्हा प्रशासनाने उपलब्ध करून द्याव्यात असे निर्देशही उपमुख्यमंत्र्यांनी दिले.
या बैठकीत प्रस्तावित 35 हेक्टर जमीन एमआयडीसी कडे हस्तांतरित करण्याला तत्वतः मंजुरी देण्यात आली.
एकंदरीतच या बैठकीमुळे कोल्हापुरातील आयटी पार्क चा मार्ग खुला झाला आहे.

  1. U­

 

*चौकट*
*कोल्हापुरातील आयटी पार्क चा महत्वपूर्ण प्रश्न मार्गी लावण्यात यश आले याचा मनस्वी आनंद आहे. जिल्हाधिकारी आणि संपूर्ण जिल्हा प्रशासनाने यासाठी केलेल्या युद्ध पातळीवरील प्रयत्नांबद्दल मी त्यांचे आभार मानतो. कृषी विभागाला द्यायच्या पर्यायी जागे संदर्भातही लवकरच निर्णय होऊन आयटी पार्कच्या कामाला सुरुवात होईल याची खात्री आहे.*
*- आमदार अमल महाडिक*

  •  


Spread the news

You may also like

error: Content is protected !!