अनंत दीक्षित पुरस्कार कुमार केतकर यांना, मोहन मस्कर पुरस्कार व्यंगचित्रकार आलोक यांना जाहीर
स्मृती समितीची घोषणा : कोल्हापुरात लवकरच वितरण
कोल्हापूर : अनंत दीक्षित स्मृती समितीचा अनंत दीक्षित स्मृती पुरस्कार ज्येष्ठ संपादक माजी खासदार कुमार केतकर आणि मोहन मस्कर स्मृती पुरस्कार ख्यातनाम व्यंगचित्रकार आलोक यांना सोमवारी जाहीर झाला. अनुक्रमे ५१ हजार आणि २१ हजार रुपये, गौरवचिन्ह असे पुरस्कारांचे स्वरुप आहे. कोल्हापुरात लवकरच या पुरस्कारांचे शानदार सोहळ्यात वितरण होणार असल्याची माहिती अनंत दीक्षित स्मृती समितीने दिली.
पत्रकारिता क्षेत्रातील योगदानासाठी हे दोन पुरस्कार देण्यात येणार आहेत. ज्येष्ठ संपादक अनंत दीक्षित यांच्या मार्गदर्शनाखाली पत्रकारिता केलेल्या पत्रकारांनी एकत्र येऊन त्यांच्या स्मृती जपण्याचा निर्णय घेतला आहे. दिवंगत मोहन मस्कर हे नव्या पिढीतील आश्वासक पत्रकार होते. ग्रामीण पत्रकारितेमध्ये त्यांनी मौलिक काम केले. या अभ्यासू पत्रकाराचे अलिकडेच आकस्मिक निधन झाले. त्यांचीही स्मृती यानिमित्ताने जपण्यात येणार आहे. प्रतिवर्षी एका ज्येष्ठ पत्रकारास संपादक अनंत दीक्षित यांच्या नावाने आणि आश्वासक पत्रकारास मोहन मस्कर यांच्या नावाने पुरस्कार देण्यात येणार आहे.
केतकर पाच दशकांहून अधिक काळ पत्रकारितेमध्ये आहेत. महाराष्ट्राच्या वृत्तपत्रसृष्टीवर त्यांच्या कर्तृत्वाचा वेगळा ठसा आहे. व्यंगचित्रकार आलोक निरंतर हे आजच्या काळातील अत्यंत लोकप्रिय व्यंगचित्रकार म्हणून राष्ट्रीय पातळीवर प्रसिद्ध आहेत. राजकारणावरील टोकदार भाष्य हे त्यांच्या व्यंगचित्रांचे वैशिष्ट्य असून देशभरात ते आपल्या खास शैलीसाठी ओळखले जातात. वयाच्या पंधराव्या वर्षी त्यांचे व्यंगचित्रांचे पहिले पुस्तक प्रसिद्ध झाले. बेंगळुरू येथील कॉलेज ऑफ फाईन आर्ट्समध्ये त्यांनी व्हिज्युअल आर्ट्सचे शिक्षण घेतले. पुणे, बेंगळुरू आणि कॅनडामध्ये त्यांच्या चित्रांची प्रदर्शने भरली आहेत.
————————-
——————————-