Spread the news

सारस्वत विकास मंडळाचा वीस एप्रिलला सुवर्ण महोत्सवी सोहळा, अभिनेत्री निशिगंधा वाड, दीपक देऊलकर प्रमुख पाहुणे
गौरव ग्रंथ प्रकाशन-मान्यवरांचा सत्कार, सायबर इन्स्टिट्यूटच्या आनंद भवन सभागृहात होणार सोहळा
कोल्हापूर : विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून वेगळी ओळख निर्माण केलेल्या सारस्वत विकास मंडळ या संस्थेला ५० वर्षे पूर्ण होत
आहेत. यानिमित्ताने २० एप्रिल २०२५ रोजी सुवर्ण महोत्सव सोहळा आयोजित केला आहे. अभिनेत्री डॉ. निशिगंधा वाड, अभिनेता दीपक
देऊलकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या सोहळयात सुवर्ण महोत्सव गौरव ग्रंथांचे प्रकाशन, मान्यवरांचा सत्कार
करण्यात येणार आहे. सायबर इन्स्टिट्यूटच्या आनंद भवन सभागृहात सकाळी दहा वाजता कार्यक्रमाला सुरुवात होईल अशी माहिती सारस्वत
विकास मंडळाचे अध्यक्ष सचिन जनवाडकर व सारस्वत विद्यार्थी वसतिगृहाचे अध्यक्ष मोहन देशपांडे, उपाध्यक्ष सिद्धार्थ लाटकर यांनी दिली
आहे.
सारस्वत विकास मंडळाने सुवर्ण महोत्सवी वर्ष विविध उपक्रमांनी साजरे केले. मंडळातर्फे सामाजिक बांधिलकी मानून रक्तदान शिबिराचे
आयोजन केले होते. वृक्षारोपन, स्वच्छता विषयक उपक्रमात सहभाग घेतला. सारस्वत विकास मंडळाची गेल्या पन्नास वर्षाची वाटचाल ही
दमदार राहिली आहे. या कालावधीत समाजबांधवांना पाठबळ दिले. समाजातील हुशार विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. विविध सामाजिक कामात
हिरिरीने सहभाग घेतला. यंदा सारस्वत विकास मंडळ ५० वर्षे पूर्ण करीत आहे. गेल्या पाच दशकांची वाटचाल ही अभिमानस्पद असून २०
एप्रिल रोजी सुवर्ण महोत्सव सोहळा साजरा होत आहे.
सुवर्ण महोत्सवी सोहळयाच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ऑल इंडिया सारस्वत कल्चरल ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष डॉ. अजित गुंजीकर हे
भूषविणार आहेत. किर्तने अँड पंडित चार्टर्ड अकौटंटसचे मॅनेजिग पार्टनर संदीप वेलिंग हे प्रमुख अतिथी आहेत. या समारंभासाठी
अभिनेत्री डॉ. निशिगंधा वाड, अभिनेते दीपक देऊलकर हे प्रमुख पाहुणे आहेत. याप्रसंगी प्रसिद्ध लेखक मयुरेश पाडगांवकर हे अभिनेत्री
वाड व अभिनेते देऊलकर यांची प्रकट मुलाखत घेणार आहेत. कलाक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या या दांपत्याचा कला, सिनेमा,
नाटक, लेखन असा जीवनप्रवास उलगडणार आहे.याप्रसंगी संस्थेचे आजी-माजी विश्वस्त, सारस्वत संस्थांचे प्रतिनिधींचा सत्कार करण्यात येणार
आहे. सुवर्ण महोत्सवानिमित्त मंडळाच्या वाटचालीवर प्रकाशझोत टाकणाऱ्या गौरव अंकाचे प्रकाशन आहे.
या कार्यक्रमासाठी समाजबांधवांनी, नागरिकांनी मोठया संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सारस्वत विकास मंडळाचे सचिव मुकुंद
कुलकर्णी, खजिनदार गुरुनाथ देशपांडे, सारस्वत बोर्डिंगचे मानद सचिव सुधीर कुलकर्णी, सहसचिव अमित सलगर यांनी केले आहे


Spread the news

You may also like

error: Content is protected !!