*श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था आणि एन आय आय टी फाउंडेशन यांच्यात सामंजस्य करार*
कोल्हापूर : कौशल्य विकास, संशोधन क्षेत्राला चालना आणि रोजगारक्षम मनुष्यबळ निर्मिती या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर आणि एन आय आय टी फाउंडेशन , नवी दिल्ली यांच्यात परस्पर सहकार्याचा सामंजस्य करार करण्यात आला. आयबीएम स्किल्स-बिल्ड प्लॅटफॉर्मद्वारे तरुणांना कौशल्य-निर्मितीच्या संधी उपलब्ध करून देणे, कौशल्य विकासासाठी नवीन अभ्यासक्रमांच्या निर्मितीची निरंतर प्रक्रिया राबवणे ही या सामंजस्य कराराची वैशिष्ट्ये आहेत.
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेतर्फे सचिवा प्रा. शुभांगी गावडे आणि एन आय आय टी फाउंडेशनतर्फे दिपक कुमार त्रिवेदी यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या. कराराच्या माध्यमातून उद्योग क्षेत्रामध्ये आवश्यक असणारी विविध तांत्रिक कौशल्ये तसेच सायबर सिक्युरिटी, क्लाऊड कॉम्प्युटिंग, डेटा अनॅलिटिक्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अशा विविध तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देण्यात येईल. त्यामुळे विविध कौशल्यांनी युक्त युवक वर्गाची निर्मिती झाल्याने स्पर्धात्मक क्षमता उच्च दर्जाची होईल आणि बेरोजगारी कमी करण्यास सहाय्य होईल. याप्रसंगी विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर; रामकृष्ण परमहंस महाविद्यालय ,धाराशिव; पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील महाविद्यालय, तासगाव; दत्ताजीराव कदम आर्ट्स सायन्स कॉमर्स कॉलेज ,इचलकरंजी; राजे रामराव महाविद्यालय, जत; डॉ. बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, मिरज; सावित्रीबाई फुले कॉलेज ऑफ नर्सिंग, कोल्हापूर; दत्ताजीराव कदम लॉ कॉलेज, इचलकरंजी ; डॉ. बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी कोल्हापूर यांनी महाविद्यालयीन स्तरावरील सामंजस्य करार केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेच्या व्यावसायिक शिक्षण समूहाचे संचालक प्रा. विरेन भिर्डी यांनी केले. त्रिवेदी यांनी कौशल्य विकास कार्यक्रमाचा आराखडा सादर केला. याप्रसंगी बोलताना प्रा. शुभांगी गावडे यांनी ” कौशल्यपूर्ण युवकच आत्मविश्वासपूर्ण असतो. ज्ञान आणि कौशल्यनिर्मिती ही निरंतर प्रक्रिया असल्याने विद्यार्थी आणि शिक्षकांनी नेहमी जागरूक असावे. या कराराच्या माध्यमातून सक्षम युवक निर्माण होईल” असा विश्वास व्यक्त केला. संस्थेच्या अर्थ विभागाचे सहसचिव प्रा. एम एस हूजरे यांनी शालेय जीवनापासूनच कौशल्य विकास महत्त्वाचा असल्याचे प्रतिपादन केले.
या करारामुळे विद्यार्थ्यांना औद्योगिक, शैक्षणिक एक्सपोजर मोठ्या प्रमाणात मिळणार आहे. विद्यार्थ्यांच्या ज्ञानाच्या आणि कौशल्याच्या कक्षा व्यापक होण्यासाठी हा करार उपयुक्त असून विद्यार्थ्यांना आपले उज्वल भविष्य निर्माण करण्यासाठी नवीन संधी मिळणार आहेत.
संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे यांचे या करारासाठी मार्गदर्शन लाभले . संस्थेच्या धाराशिव विभागाचे प्रमुख प्राचार्य डॉ. जे. एस. देशमुख, डॉ. बापूजी साळुंखे इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटचे प्राचार्य डॉ. सुहास सपाटे, प्राचार्य डॉ. एस एस मणेर, आर के भडके, प्रा. डॉ. के ए कांबळे, प्रा. डॉ. सी एस बागडी, विभागप्रमुख, विद्यार्थी, शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी यांचेसह मान्यवर उपस्थित होते. प्रा. सुदर्शन महाडिक यांनी सूत्रसंचालन केले. समन्वयक प्रा. विराज जाधव यांनी नियोजन केले.