विश्वास नारायण पाटील यांचा रविवारी भव्य नागरी सत्कार
गौरव अंकाचे होणार प्रकाशन
कोल्हापूर
गोकुळ दूध संघाचे माजी अध्यक्ष विश्वास नारायण पाटील (आबाजी) यांचा रविवार दिनांक 13 एप्रिल रोजी अमृत महोत्सवी वाढदिवस गौरव समारंभ होणार आहे. करवीर तालुक्यातील शिरोली दुमाला येथील केंद्र शाळेच्या मैदानावर सायंकाळी साडेचार वाजता हा कार्यक्रम होणार आहे. विश्वास नारायण पाटील अमृत महोत्सव गौरव समितीच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
यावेळी राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते आबाजींचा गौरव करण्यात येईल. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान खासदार शाहू महाराज हे भूषवणार आहेत. यावेळी आरोग्य मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबीटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते सतेज पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. याशिवाय समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमात आबाजींच्यावर काढण्यात आलेल्या गौरव अंकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. या संयुक्त कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन निमंत्रक व गोकुळ दूध संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी केले आहे.