राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे च्यावतीने कोल्हापूर जिल्ह्यातील दहा शिक्षकांच्या पुस्तकांची निवड
कबनूर ता.७- राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे प्रसारमाध्यम विभाग समग्र शिक्षा सन २०२४-२५ अंतर्गत ग्रंथालय पुस्तक निर्मिती उपक्रमामध्ये राज्यातून २२९ नियमित अधिकारी व शिक्षक यांच्या पुस्तकांची निवड झाली.त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील नियमित अधिकारी व शिक्षकांच्या दहा पुस्तकांची निवड झाली असल्याची माहिती कोल्हापूर जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या वरिष्ठ अधिव्याख्याता डॉ.अंजली रसाळ यांनी दिली.निवड करण्यात आलेली पुस्तके पीएमश्री शाळा अंतर्गत ७०,००० शाळांना वितरित करण्यात येणार आहेत.
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्याकडून शिक्षकांची ग्रंथालय पुस्तक निर्मिती कार्यशाळा इयत्ता पहिली ते तिसरी,चौथी ते पाचवी,सहावी ते आठवी,नववी ते दहावी, आणि अकरावी ते बारावी या पाच स्तरांसाठी
राज्यात जिल्हानिहाय घेण्यात आली. त्यामध्ये राज्यातील एकूण २६१ जणांची निवड करण्यात आली होती.त्यामधून अंतिम निवड २२९ पुस्तकांची झाली.
कोल्हापूर जिल्ह्यातील शिक्षकांसाठी घेण्यात आलेल्या पुस्तकनिर्मिती कार्यशाळेत ४६ शिक्षकांनी सहभाग घेतला.तीन महिन्याच्या कालावधीत ३० शिक्षकांनी पुस्तके लिहून सादर केली.जिल्हास्तरीय समिती सदस्यांनी निकषानुसार त्यातील १८ पुस्तकांची निवड केली.राज्यस्तरीय निवड समितीने त्यातील १० जणांच्या पुस्तकांची अंतिम निवड केली.
कोल्हापूर जिल्ह्यातील निवड झालेले नियमित अधिकारी,शिक्षक लेखक व त्यांची पुस्तके-
संगीता भरत अलगौंडर,कुमार विद्या मंदिर, गांधीनगर ता.करवीर (काव्यांगण),चंद्रशेखर तेली नेहरू विद्या मंदिर,शिंदेवाडी ता.करवीर (ग ग गमाडी गंमत मनुची),सादिया रियाज मुजावर विद्या मंदिर,चव्हाणवाडी ता.करवीर(स्प्राऊट्स), ,सुभाष भाऊ चोपडे विद्या मंदिर,पाचरडे ता.भुदरगड( जमाडी जंमत करूया गंमत), डॉ.अंजली सतीश रसाळ,वरिष्ठ अधिव्याख्याता, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था,कोल्हापूर (चिमुकल्यांची नाटकुली),मधुकर शिवाजी मुसळे,विद्या मंदिर,कुडित्री ता.राधानगरी (चांदण्यांचे झाड),सचिन आनंदराव रोडे,शिरटी हायस्कूल,शिरटी (द वर्ल्ड ऑफ पोएम),श्रीकांत श्रीपती पाटील,बळवंतराव यादव हायस्कूल, पेटवडगाव(पावसाळी पाहुणे) प्रा.रवींद्र बाबासो पाटील,अण्णासाहेब डांगे महाविद्यालय, हातकणंगले(क्रांतिवीर),ऋतुजा आशिष गुरव मुख्याध्यापिका,सौ.शिलादेवी डी.शिंदे-सरकार हायस्कूल,तपोवन,कोल्हापूर (व्यक्तिमत्व विकास व व्यवसाय मार्गदर्शन)
कोल्हापूर जिल्ह्यातील या लेखकांच्या गौरवशाली निवडीबद्दल कोल्हापूर जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ.राजेंद्र भोई यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला तसेच गारगोटी येथील अक्षर साहित्य मंचच्यावतीने मे महिन्यात लेखकांचा मान्यवरांच्याहस्ते सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करणार असल्याचे मंचचे अध्यक्ष व राष्ट्रपती शिक्षक पुरस्कारप्राप्त लेखक डॉ.मा.ग.गुरव यांनी जाहीर केले.
फोटोओळ:
कोल्हापूर: राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे च्या राज्यस्तरीय समितीकडून कोल्हापूर जिल्ह्यातून निवड झालेले लेखक