*संदीप भंडारी यांची जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ, महाराष्ट्र शासनाच्या समन्वयकपदी नियुक्ती*”
मुंबई : जैन समाजाच्या धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने स्थापन झालेल्या “जैन अल्पसंख्यक आर्थिक विकास महामंडळ” च्या समन्वयकपदी भाजपा जैन प्रकोष्ठचे प्रदेशाध्यक्ष संदीप भंडारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
महामंडळाच्या प्रमुख उद्दिष्टांमध्ये राज्यातील जैन समाजाच्या कल्याणासाठी आणि सामाजिक सक्षमीकरणासाठी प्रभावी योजना राबवणे यावर भर दिला जाणार आहे. विशेषतः, अल्पव्याज दराने स्वयंरोजगारासाठी कर्ज उपलब्ध करून देणे, जैन तीर्थांचे संरक्षण व संवर्धन, जैन ग्रंथांचे पुनर्लेखन आणि जतन करणे, कायम पायी विहार करणाऱ्या जैन साधू-संतांसाठी सुरक्षा व्यवस्था निर्माण करणे, तसेच आर्थिक दुर्बल जैन विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती व शैक्षणिक कर्ज योजना राबवणे या महत्त्वपूर्ण उपक्रमांवर भर दिला जाणार आहे.
महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने विधवा आणि परित्यक्ता जैन महिलांसाठी विशेष योजनांची अंमलबजावणी करण्यात येणार असून, समाजातील शेवटच्या घटकापर्यंत या सुविधांचा लाभ पोहोचवण्याचा महामंडळाचा प्रयत्न राहील.
महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या नेतृत्वाखाली या योजना प्रभावीपणे राबवण्याचा निर्धार करण्यात आला आहे. योजनांची परिणामकारक अंमलबजावणी आणि व्यापक समाज सहभाग वाढवण्यासाठी लवकरच राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हा समित्यांची स्थापना केली जाईल, अशी माहिती संदीप भंडारी यांनी दिली.
या नियुक्तीबद्दल जैन समाजात आनंद व्यक्त केला जात असून, संदीप भंडारी यांचे विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आणि समाजबांधवांनी अभिनंदन केले आहे.
_______________________________________________