शहिदच्या विद्यार्थिनींचे कर्तृत्व भारावून टाकणारे : विजयालक्ष्मी आबिटकर
शहीद महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे
कोल्हापूर
शहीद महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींमध्ये असलेला आत्मविश्वास, मेहनत आणि नवकल्पनांचा विचार पाहून मन भारावून गेले आहे. अशीच उत्तुंग प्रगती करत रहा, आणि आपल्या संस्थेचे नाव उंचवत रहा, असे मत मा. विजयालक्ष्मी प्रकाशराव आबिटकर यांनी व्यक्त केले. शहीद महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण समारंभात त्या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. अध्यक्षस्थानी वीरपत्नी लक्ष्मीबाई पाटील होत्या.
शिक्षणतज्ञ डॉ. जगन्नाथ पाटील, पोलीस उपअधीक्षक वैष्णवी पाटील, मा वंदना जाधव आणि पोलीस उपनिरीक्षक प्रणाली पवार आदी मान्यवरांच्या उपस्थितीत आणि 1000 हून अधिक मुलींच्या जल्लोषपूर्ण सहभागात शहीद वीर पत्नी महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले.
याप्रसंगी विशेष उपस्थित असलेले संस्थेचे मुख्य मार्गदर्शक शिक्षण तज्ञ डॉक्टर जगन्नाथ पाटील म्हणाले, ‘आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये प्लेसमेंट, कला व क्रीडा क्षेत्रामध्ये राज्यस्तरावर भरारी, सामाजिक कार्यात आणि पर्यावरण संरक्षण क्षेत्रात अतुलनीय काम असे अनेक मानदंड स्थापित करण्याचे काम केवळ सहा वर्षे वयाच्या शहीद वीर पत्नी महाविद्यालयाने केलेल आहे. खेडोपाड्यातील, वाड्या वस्ती मधील मुलींनी हा चमत्कार केला आहे . आपण कोण आहोत, समाजाला काय देणं लागतं हे शहीद शिक्षण प्रसारक मंडळ विद्यार्थ्यांना शिकवत आणि विद्यार्थ्यांनकडून करून घेत याच उदाहरण म्हणजे आमच्या संस्थेने 25000 हजार हून अधिक झाडं लावली आहोत व त्याचे पालनपोषण करतात.
संस्थेच्या पुढाकाराने पर्यावरण संवर्धन केंद्र पाल भुदरगड येथे सुरू करण्याचा मानस आहे. हे केंद्र जागतिक पातळीवर पर्यावरणप्रेमींसाठी एक महत्त्वाचे आकर्षण ठरेल. जगभरातील अभ्यासक आणि पर्यटक या केंद्राला भेट देतील आणि पर्यावरण रक्षणाच्या या महत्त्वाकांक्षी उपक्रमाची प्रेरणा घेतील, असे प्रतिपादन डॉ. जगन्नाथ पाटील यांनी केले.
ज्या क्षेत्रात काम कराल, तिथे सर्वोत्तम बना, नवीन कौशल्य शिकत राहा, यशस्वी बना. मेहनत, चिकाटी आणि जिद्द ठेवा म्हणजे नक्कीच तुमची स्वप्नं पूर्ण होतील, असा विश्वास लाच लुचपत विभागाच्या पोलिस उपअधिक्षक वैष्णवी पाटील यांनी व्यक्त केला.
राधानगरीच्या पोलिस सब इन्स्पेक्टर प्रणाली पवार यांनी ‘तुमच्या नावाने तुमच्या आईवडिलांना ओळखलं पाहिजे अशी ओळख निमार्ण करा असे मत व्यक्त केले.’
शहीद संस्थेचे उल्लेखनीय कार्य पाहून डोळे आनंदाने भरून आले, असे गौरवोद्गार कोल्हापूर जिल्ह्याच्या माजी सभापती वंदना जाधव यांनी काढले. संस्थेच्या विद्यार्थिनी सोन्यासारख्या असून, त्यांच्या गुणांना घडवून सुंदर दागिन्यांचे स्वरूप देण्याचे कार्य डॉ. जगन्नाथ पाटील करत आहेत, असेही त्यांनी सांगितले. संस्थेच्या कार्यामुळे समाजात सकारात्मक बदल घडत असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.
यावेळी डॉ. राजेंद्र पारिजात यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी वीरपत्नी मालुताई मगदूम, पौर्णिमा कुलकर्णी, सतीश कुलकर्णी, प्रा. सुनील पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती
या स्नेहसंमेलनाचे खास आकर्षण ठरले ते म्हणजे वॉक ऑफ फेम सोहळा, जिथे नामांकित कंपन्यांमध्ये नोकरी मिळविलेल्या विद्यार्थिनी आणि त्यांच्या पालकांचा सन्मान करण्यात आला. मुंबई पोलीस, इंडियन पोस्ट, इन्फोसिस, विप्रो, आयसीआयसीआय यांसारख्या प्रतिष्ठित संस्थांमध्ये आपले स्थान मिळवणाऱ्या विद्यार्थिनींनी आपल्या मेहनतीने आणि जिद्दीने एक वेगळा ठसा उमटवला. आपल्या आई-वडिलांसोबत जेव्हा या यशस्वी विद्यार्थिनींनी रॅम्प वॉक केला तेव्हा त्यांच्या या यशाचा गौरव करण्यासाठी, संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या कडकडाटाने दणाणून गेले. या सोहळ्याने उपस्थितांना प्रेरणादायी ऊर्जा दिली आणि पुढील पिढीला मेहनत, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या बळावर यशाच्या शिखरावर पोहोचण्याची प्रेरणा दिली.
भावसाक्षरता, वैज्ञानिक दृष्टिकोन, वाहन विवेक, राष्ट्रीय जबाबदारी, सोशल मीडिया जनजागृती ,ध्येय निश्चिती, निसर्गाबाबतची कृतज्ञता या समाजमन घडवणाऱ्या विषयावर विद्यार्थिनींनी सुंदर सादरीकरण केले. युवा महोत्सव, विद्यापीठ स्तरीय क्रीडा स्पर्धा, महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धा पारितोषिक विजेत्या विद्यार्थिनी, गुणवंत विद्यार्थिनींचा या प्रसंगी सत्कार करण्यात आला.
शहीद शिक्षण संकुलामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील १५० हून
अधिक गावांतून ११०० हून अधिक विद्यार्थी, विद्यार्थिंनी शिक्षण घेत आहेत. येथे पारंपारिक शिक्षणाऐवजी कॉम्प्युटर सायन्स, मास कम्युनिकेशन , डी. एम. एल. टी., कॉम्प्युटर सायन्स, बी.एस्सी मायक्रोबायोलॉजी व फूड अँड न्यूट्रिशन, एम.एस्सी कम्प्युटर सायन्स, एम.एस्सी मायक्रोबायोलोजी, एम.एस्सी रसायनशास्त्र असे आधुनिक, व्यावसायिक व रोजगाराभिमुख अभ्यासक्रम शिकवले जातात. त्यामुळेच परीक्षेपूर्वीच विद्यार्थिनींना मोठमोठ्या कंपन्या मधून नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. महाविद्यालयाच्या विविध विभागातील विद्यार्थिनी टी.सी.एस., कॅप्जेमिनी सारख्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये काम करत आहेत. संस्थेचे शहीद सिताराम पाटील कॉलेज ऑफ फार्मसी,शहीद सिताराम कॉलेज ऑफ आर्किटेक्चर,शहीद सीताराम पाटील कॉलेज ऑफ पीजी, मुक्ताई कॉलेज ऑफ नर्सिंग,तसेच संस्थेचे शहीद पब्लिक स्कूल गेल्या अनेक वर्षापासून कार्यरत आहे. विद्यानिकेतन गुणवत्ता शिष्यवृत्तीच्या माध्यमातून शहीद पब्लिक स्कूलने अनेक इंजिनियर्स ,डॉक्टर्स व विविध क्षेत्रातील यशवंत घडविले आहेत. त्यामुळे केजीपासून ते पीजीपर्यंत अभ्यासक्रम उपलब्ध असलेले एक अतिशय सुरक्षित व आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त असे शैक्षणिक संकुल शहीद परिवाराने तिटवे सारख्या खेडेगावात उभे केले आहे.
या सोहळ्याला आजी-माजी विद्यार्थिंनी, हितचिंतक, पालक प्राचार्या स्नेहल माळी, प्राचार्या सिद्धता गौड, प्राचार्य बाबासाहेब कांबळे, प्राचार्य सरिता धनवडे आणि शैक्षणिक – माध्यम – सांस्कृतिक विश्वातील मान्यवर उपस्थित होते . कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य प्रशांत पालकर यांनी केले. कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून प्रा अश्विनी कांबळे यांनी जबाबदारी पहिली. सुत्रसंचालन प्रा.शुभांगी भारमल,प्रा. दिग्विजय कुंभार यांनी केले, तर आभार प्रा. तेजस्विनी परबकर यांनी मानले.
फोटो ओळ: शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालयाच्या स्नेह संमेलन प्रसंगी यशस्वी विद्यार्थिनींचा सत्कार करताना मा. विजयालक्ष्मी आबिटकर, वीरपत्नी लक्ष्मीबाई पाटील, शिक्षणतज्ञ डॉ. जगन्नाथ पाटील, पोलीस उपअधिक्षक वैष्णवी पाटील, सब इन्स्पेक्टर प्रणाली पवार, मा. वंदना जाधव, प्रा. प्रशांत पालकर, प्रा. सुनिल पाटील व अन्य मान्यवर.