*कोल्हापुरातील प्रस्तावित दंतवैद्यकीय महाविद्यालयासाठी शेंडा पार्क येथे दहा एकर जमीन द्यावी -आमदार अमल महाडिक यांची मंत्री मुश्रीफांकडे मागणी*
कोल्हापूर
शासकीय दंतवैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याला 2011 सालीच मंजुरी मिळाली आहे. तथापि जागे अभावी हे महाविद्यालय सुरू होऊ शकलेले नाही. या गोष्टीची दखल घेऊन आमदार अमल महाडिक यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेतली. शेंडा पार्क येथे साकारत असलेल्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय नगरीतील 10 एकर जागा दंतवैद्यकीय महाविद्यालयासाठी द्यावी अशी मागणी आमदार महाडिक यांनी मंत्री मुश्रीफ यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. शेंडा पार्क येथे मेडिकल हब उभे राहत आहे यामध्ये अकराशे बेडचे सुसज्ज हॉस्पिटल तसेच सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आणि कॅन्सर हॉस्पिटलचा समावेश आहे. या ठिकाणीच दंतवैद्यकीय महाविद्यालयाची उभारणी झाल्यास रुग्णांची सोय होणार आहे. तरी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावून जागा हस्तांतरणासंदर्भात निर्णय व्हावा अशी मागणी आमदार महाडिक यांनी केली आहे.
या मागणीची तातडीने रखल घेत नामदार मुश्रीफ यांनी लवकरच संबंधित विभागाची बैठक घेऊन निर्णय घेण्याचा विश्वास दिला.
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या नावाने कोल्हापुरातील शेंडा पार्क येथे साकारणाऱ्या वैद्यकीय नगरीमध्ये दंत वैद्यकीय महाविद्यालय लवकरच उभारले जाईल अशी आशा आहे.