*कृषी पंपाला सौर जोडणी घेण्याची सक्ती कशासाठी*
*आमदार सतेज पाटील यांचा विधिमंडळात सवाल : फेब्रुवारी २०२४ पर्यंतच्या ग्राहकांना पारंपरिक वीजजोडणी*
*कोल्हापूर :* राज्यात मागील दीड-दोन वर्षांपासून महावितरण कंपनीमार्फत कृषी पंपाला पारंपरिक पध्दतीने वीज जोडणी न देता सौर जोडणी घेण्याची सक्ती केली जात आहे. ही सक्ती कशासाठी असा प्रश्न विधानपरिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी अधिवेशनात उपस्थित केला. यावर मुख्यमंत्री तथा उर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २२ फेब्रुवारी २०२४ पर्यंत ज्या प्रलंबित ग्राहकांचे आवश्यक पायाभूत सुविधाचे काम प्रगतीपथावर आहे अशा ग्राहकांना पारंपारिक पध्दतीने वीज जोडणी देण्याचा आणि उर्वरित ग्राहकांना सोलर पंपाद्वारे वीज जोडणी देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले.
मागील दीड-दोन वर्षांपासून महावितरण कंपनीमार्फत कृषी पंपाला पारंपारिक पध्दतीने वीज जोडणी न देता सौर जोडणी घेण्याची सक्ती केली जात असल्याकडे सतेज पाटील यांनी लक्ष वेधले. ते म्हणाले, अल्पभूधारकांच्या नदीकाठच्या पुराच्या क्षेत्रात सोलर जोडणीस अडचणी येत असल्याने पूर्वीप्रमाणे पारंपरिक वीज जोडणी देण्याची मागणी पंपधारक शेतकऱ्यांकडून होत आहे. राज्यात कृषी पंपाला पारंपारिक वीज जोडणी मिळण्यासाठी केलेल्या अर्जाची संख्या मोठ्या प्रमाणात असून वीज जोडणी देण्याबाबत शासनाने कोणती उपाययोजना केली असा सवाल त्यांनी केला. यावर मुख्यमंत्री फडणवीस
यांनी २२ फेब्रुवारी २०२४ पुढील शेतीच्या नवीन वीज जोडण्या सोलर पंपाच्या माध्यमातून देण्याचा निर्णय झाला असल्याचे सांगितले. अडचणीचे निराकरण करण्याची कार्यवाही
शेतकऱ्यांकडून पारंपरिक वीज जोडणी देण्याची मागणी होत असली तरी शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणीचे निराकरण करुन सौरपंप देण्याबाबत पुढील कार्यवाही महावितरण कंपनीमार्फत सुरु आहे. पर्यावरणाचे रक्षण करणे, आणि हरित उर्जेला प्रोत्साहन देण्याचे उद्दिष्ट ठेवून राज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर उर्जेव्दारे विद्युतीकरण करण्याचे धोरण महावितरणने स्वीकारले असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.