कोल्हापूर :* राज्यभरातील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आणि शक्तीपीठ महामार्गाविरोधात एकसंध लढा उभारण्यासाठी आज गुरुवारी कोल्हापुरात १२ जिल्ह्यांतील शक्तीपीठ महामार्गाने बाधित शेतकऱ्यांची राज्यव्यापी बैठक होणार आहे. सकाळी 10. 00 वाजता राजर्षी शाहू स्मारक भवन, दसरा चौक येथे आयोजित या बैठकीला काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील, माजी आमदार संजय घाटगे यांची प्रमुख उपस्थिती असेल. शक्तीपीठ महामार्गात हजारो शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार असून, त्यांचे अस्तित्व संकटात येणार आहे. शासनाने विरोध डावलून हा प्रकल्प पुढे रेटण्याचा प्रयत्न केल्यास शेतकरी शांत बसणार नाहीत. या पार्श्वभूमीवर महामार्गाच कायमस्वरूपी रद्द करण्यासाठी पुढील आंदोलनात्मक दिशा ठरवण्यासाठी ही बैठक होणार आहे.
बारा जिल्ह्यातील बाधित शेतकरी, शेतकरी नेते आणि संघर्ष समितीचे पदाधिकारी या बैठकीस मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असून, महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी ठोस निर्णय घेण्यात येणार आहे. या बैठकीस उपस्थित राहून आपल्या हक्काच्या लढ्याला बळ द्यावे, असे आवाहन संघर्ष समितीचे समन्वयक गिरीष फोंडे यांनी केले.