कोल्हापूर*
विधानसभा अधिवेशनात महाराष्ट्र एकीकरण समिती व सीमा बांधव मुंबईला धडक देणार आहेत. महाराष्ट्र एकीकरण समिती व कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वपक्षीय समितीची बैठक विश्रामधाम कोल्हापूर येथे विजय देवणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली , या बैठकीला महाराष्ट्र एकीकरण समितीचे मनोहर किणीकर व प्रकाश मरगळे उपस्थित होते . यावेळी सीमाप्रश्नावर सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्र शासनाने सीमाभागाची बाजू भक्कमपणे मांडावी , कर्नाटकातील पोलिसांच्या अत्याचाराचा महाराष्ट्र सरकारने प्रतिबंध करावा , सीमाभागातील ८६५ गावात महाराष्ट्र शासनाच्या सर्व योजनांची अंमलबजावणी व्हावी यासाठी महाराष्ट्र एकीकरण समिती , सीमाबांधव व महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेते एकत्रितपणे महाराष्ट्र शासनाच्या मार्च महिन्यातील अधिवेशनात रॅली ने जाऊन विधानभवनावर धडक देणार अश्या पद्धतीचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला .
या बैठकीला कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वपक्ष नेत्यांनी सीमाबांधवांच्या पाठीशी आम्ही व महाराष्ट्रातील सर्व जनता ठामपणाने पाठीशी उभे आहोत अशी ग्वाही महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना दिली .
महाराष्ट्रातून या आंदोलनास सर्वोतोपरी आम्ही मदत करू असे कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी सांगितले .
या बैठकीला व्ही. बी. पाटील , वसंत मुळीक , सुभाष जाधव , सतीशचंद्र कांबळे , संभाजीराव जगदाळे , शिवाजीराव परुळेकर , बाबुराव कदम आदी उपस्थित होते .
तसेच महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते मनोहर किणीकर व प्रकाश मरगळे यांनी गारगोटी येथे नामदार प्रकाश आबिटकर , पालकमंत्री, कोल्हापूर जिल्हा यांची भेट घेऊन महाराष्ट्र शासनाने ताकदीने सीमावासियांच्या पाठीशी अभे राहावे अशी विनंती केली . पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी महाराष्ट्र एकीकरण समिती व सीमाभागातील मराठी बांधवांना महाराष्ट्र सर्वोत्तोपरी मदत करेल अशी ग्वाही दिली .*