कोल्हापूर : मुलांमध्ये चांगले विचार रुजविण्याची ताकद चांगल्या चित्रपटांमध्ये आहे. या माध्यमातून लहान मुलांच्या विचारांमध्ये बदल घडवून आणण्याचे काम चिल्लर पार्टी करत आहे, ही चळवळ राज्यभर पोहोचण्याची गरज आहे, असे प्रतिपादन पीपल लघुपटाचे दिग्दर्शक गणेश चौगुले यांनी केले.
चिल्लर पार्टी आणि कोल्हापूर महानगर पालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीने या महोत्सवाचे आयोजन केले आहे. येथील शाहू स्मारक भवन येथे पर्यावरण संवर्धनाचा सशक्त संदेश देणाऱ्या आणि समाजमनाला विचारप्रवृत्त करणाऱ्या ‘पीपल’ या हिंदी लघुपटाने गुरुवारी चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळ आयोजित आठव्या बाल चित्रपट महोत्सवास प्रारंभ झाला. दिग्दर्शक गणेश चौगुले यांच्या हस्ते बालप्रेक्षकांसमवेत सेल्फी घेत अनोख्या पध्दतीने उद्घाटन केले.
चौगुले म्हणाले, खायला गुटखा, खेळायला मटका, नुसताच सटका, अंगात झटका, कपड्यात नाही नीटनेटका, घरात रोज खटका, अभ्यासात मात्र लटका, नापास झाल्यावर नुसतेच भटका, टाकणार नाही कोणीच तुटका (तुकडा) असे होउ नका. चांगले शिका आणि मोठे व्हा असा सल्ला देत चौगुले यांनी चिल्लर पार्टीच्या या उपक्रमाचे कौतुक केले. पीपल चित्रपटातून गावी असलेल्या पिंपळाच्या झाडाशी जोडलेली बालपणीची आठवण आणि मोठेपणी ते झाड तोडल्याने बसलेला धक्का, त्यातून उभे राहिलेले काम असा भावनिक प्रवास मांडला, त्यातून अनेकांना वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धनासाठी प्रेरित केले आहे, असेही ते म्हणाले. अभय बकरे यांनी प्रास्तविक केले. यावेळी कराडचे माजी मुख्य अभियंता ए. आर. पोवार, शिवप्रभा लाड, डॉ. शशिकांत कुंभार, महापालिकेचे शैक्षणिक पर्यवेक्षक उषा सरदेसाई आणि विजय माळी, पेठवडगाव येथील डॉ. अमोल पाटील यांच्यासह चिल्लर पार्टीचे सुधाकर सावंत, ओंकार कांबळे, मिलिंद नाईक, मिलिंद कोपर्डेकर, अनिल काजवे, देविका बकरे आदी सदस्य उपस्थित होते.
दीड हजार विद्यार्थ्यांनी घेतला आनंद
पहिल्या दिवशी पीपलसोबत डॉ. डू लिटिल आणि फ्लाय अवे होम हे चित्रपट दाखवण्यात आले. याचा महापालिकेच्या शाळेतील १५०० बालप्रेक्षकांनी आनंद घेतला. सभागृहात तसेच आवारात फुलपाखरांच्या प्रतिकृती टांगलेल्या होत्या.
फुलपाखरांच्या प्रतिकृतीचे प्रदर्शन
या महोत्सवाचा लोगो असलेल्या भिरभिरणाऱ्या फुलपाखरांच्या कागदाच्या प्रतिकृती मुलांनी शाळेतूनच तयार करुन आणल्या होत्या. त्याचे प्रदर्शन शाहू स्मारक भवनाच्या आवारात उभारलेल्या सेल्फी पॉईंटवर करण्यात आले. प्रत्येक चित्रपटाच्या प्रदर्शनाआधी आणि नंतर मुले शिक्षक तसेच चिल्लर पार्टीच्या सदस्यांच्या मोबाईलवरुन सेल्फी घेत होते.
—–
आजचे चित्रपट
-पॅडिंगटन : स. ९ वा.
-विपलाला : स. ११:०० वा
-क्लिफर्ट द रेड डॉग : दु. १ वा.
फोटो ओळी : कोल्हापुरात शाहू स्मारक भवनात गुरुवारी दिग्दर्शक गणेश चौगुले यांच्या हस्ते सेल्फी घेत चिल्लर पार्टीच्या बालचित्रपट महोत्सवाचे उद्घाटन झाले. यावेळी डावीकडून कराडचे माजी मुख्य अभियंता ए. आर. पोवार, पर्यवेक्षक उषा सरदेसाई, डॉ. अमोल पाटील, पर्यवेक्षक विजय माळी उपस्थित होते.