कोल्हापूर
यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर म्हणजेच 1980 नंतर शिक्षणाचे भ्रष्टाचारीकरण झाले. वरिष्ठ महाविद्यालयातील भरतीचा दर ६० लाखांवर तर माध्यमिक शाळांचा दर ३५ लाखांवर गेला. यातून नेमलेला शिक्षक प्रामाणिकपणाचे काय धडे देणार आणि त्याने झोकून देवून अध्यापन करावे अशी अपेक्षा तरी कशी करणार असा सवाल ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजन गवस यांनी उपस्थित केला.
डॉ. विजया वाड संपादित ‘सुवर्णकण भाग २’ या ग्रंथालीच्या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. मीना शेंडकर, ज्येष्ठ पत्रकार दशरथ पारेकर, समीर देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. गवस म्हणाले, आपली शिक्षण पध्दती माणूस किंवा नागरिक तयार करत नाही ही वस्तूस्थिती आहे. केवळ यंत्रे तयार करण्याचे काम सध्या सुरू आहे. कौशल्याधारित शिक्षण देण्याआधी माणूस घडवण्याची गरज आहे. शिक्षण सल्लागारांचा मेंदू नेमका कोठे असतो हा मला पडलेला प्रश्न आहे. किमान पंतोजी पध्दतीच्या शिक्षणामध्ये त्या मुलाचा सर्वांगिण विकासासाठी प्रयत्न केले जायचे. परंतू १९८० पर्यंत म्हणजे यशवंतराव चव्हाण होते तोपर्यंत हे चित्र होते. परंतू नंतर या क्षेत्रात भ्रष्टाचाराला सुरूवात झाली. पहिलीपासून इंग्रजी या निर्णयामुळे धड मराठीही नाही आणि इंग्रजीही येत नाही अशी स्थिती असून १२वीत गेल्यानंतर विद्यार्थ्याच्या दुभंगल्या व्यक्तित्वाचे दोष कळायला लागतात. यावेळी त्यांनी भाग्यश्री फौंडेशनच्या रोजनिशी लेखन उपक्रमाचे कौतूक केले.
डॉ. मीना शेंडकर म्हणाल्या, आईवडिलांपेक्षाही शिक्षकांना अधिक महत्व असे मी मानते. कारण रयत शिक्षण संस्थेने आमच्या परिसरात सर्वेक्षण केले नसते आणि आम्ही शाळेत न जाणाऱ्या मुलींना शाळेत प्रवेश घ्यायला लावला नसता तर आज मी शिक्षणाधिकारी म्हणून येथे दिसलेही नसते. पुस्तकाच्या सहसंपादिका भाग्यश्री फौंडेशनच्या शिल्पा खेर म्हणाल्या, आपल्याकडे गुरूशिष्य परंपरा रूजली आहे. परंतू बदलत्या परिस्थितीत या परंपरेचे महत्व अधोरेखित करण्यासाठीच या पुस्तकाची निर्मिती करण्यात आली. ग्रंथालीचे विश्वस्त हिंगलासपूरकर यांनी प्रकाशनाच्या विविध उपक्रमांची माहिती देवून कोल्हापुरातही कार्यक्रम घेण्याची इच्छा व्यक्त केली.
ज्येष्ठ पत्रकार दशरथ पारेकर यांनी मराठी शाळा आणि मराठी भाषा यांच्या भवितव्यावर यावेळी बोट ठेवले. पत्रकार समीर देशपांडे म्हणाले, काही गैरवर्तन करणाऱ्या शिक्षकांमुळे समाजाचा शिक्षकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला असून अजूनही मनापासून योगदान देणाऱ्या शिक्षकांचे प्रमाण अधिक आहे.
यावेळी मनिषा कदम, डॉ. बी. एम. हिर्डेकर, डॉ. रणधीर शिंदे, डॉ. जी. पी. माळी, डॉ. अलोक जत्राटकर, डॉ. कल्पना मेहता, अनुराधा मेहता, जयश्री जाधव, राम देशपांडे, रवींद्र जोशी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी या पुस्कातील लेखकांचा सत्कार करण्यात आला. तसेच निशिगंधा वाड फाैंडेशनतर्फे राेजनिशी लिहणाऱ्या विद्यार्थीनींना बक्षिसे देण्यात आली. जयश्री देसाई यांनी सूत्रसंचालन केले.
फोटो ओळी
ग्रंथालीकडून डॉ. विजया वाड संपादित ‘सुवर्णकण भाग २’ पुस्तकाचे प्रकाशन मंगळवारी डॉ. राजन गवस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डावीकडून मनिषा कदमा, शिल्पा खेर, डॉ. मीना शेंडकर, दशरथ पारेकर उपस्थित होते.