राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे स्त्री शिक्षण विषयक कार्य अद्वितीय:डॉ इस्माईल पठाण शहाजी महाविद्यालयात राजर्षी छत्रपती शाहू महाराज जीवन कार्यावर इतिहास परिषद संपन्न

Spread the news

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे स्त्री शिक्षण विषयक कार्य अद्वितीय:डॉ इस्माईल पठाण

शहाजी महाविद्यालयात राजर्षी छत्रपती शाहू महाराज जीवन कार्यावर इतिहास परिषद संपन्न

कोल्हापूर: राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे स्त्री शिक्षण विषयक कार्य हे जगात अद्वितीय स्वरूपाचे आहे.त्यांचे स्त्री शिक्षण विषयक आणि स्त्री संरक्षण विषयाचे कायदे आजही तितकेच महत्त्वाचे आहेत असे प्रतिपादन ज्येष्ठ इतिहास संशोधक व लेखक प्राचार्य डॉ.इस्माईल पठाण यांनी केले. श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयात आज डॉ. सुनीलकुमार लवटे अमृत महोत्सव वर्ष आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त इतिहास परिषद संपन्न झाली. त्यात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण अध्यक्षस्थानी होते.
छत्रपती शाहू महाराज यांच्या अर्ध पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून इतिहास परिषदेस सुरुवात झाली. डॉ सुनीलकुमार लवटे यांनी तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्या समग्र वाङ्मय ग्रंथाचे अठरा खंड यावेळी श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयातील शिवाजी ग्रंथालयास भेट दिले.
कोल्हापूर प्रेस क्लब च्या वतीने जीवनगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल जेष्ठ पत्रकार गुरुबाळ माळी यांचा डॉ. सुनीलकुमार लवटे यांच्या हस्ते ग्रंथ देवून सत्कार करण्यात आला.
राजर्षी शाहू व स्त्री शिक्षण या विषयावर बोलताना प्राचार्य डॉ. पठाण म्हणाले राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या संस्थानात विधवा पुनर्विवाह कायदा लागू केला. आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देऊन दिले. अठरा वर्षे पूर्ण झालेल्या तरुणीला तिचा जोडीदार निवडण्याचे स्वातंत्र्य आणि अधिकार दिला. घटस्फोट कायद्याद्वारे घटस्फोटीत स्त्रीला पोटगी मिळावी यासाठी कायदे केले. देवदासी प्रथा बंद केली. महात्मा फुले यांच्या स्त्री शिक्षणाचा विचार पुढे नेला. मुलींच्या साठी स्वतंत्र शाळा सुरू करून चौथीतल्या मुलींना शिष्यवृत्ती दिल्या. राजाराम महाविद्यालयात मुलींना शिक्षण मोफत केले. त्यांच्या सर्व शिक्षणाचा खर्च राज दरबारातून केला. आपली विधवा सून इंदुमती राणी साहेब यांना शिक्षणासह , घोडेस्वारी, मोटार चालवणे याचे शिक्षण दिले.प्रौढ महिलांना शिक्षणासाठी होस्टेलची व मेस ची सोय केली. कोल्हापुरात शिक्षणासाठी अनेक वस्तीगृहे निर्माण केली. कृष्णाबाई केळवकर यांना मेडिकलच्या शिक्षणासाठी परदेशी पाठवले व संपूर्ण खर्च केला. एवढेच नव्हे तर कोल्हापूर संस्थानात त्यांना वैद्यकीय अधिकारी म्हणून नेमले. इंदुमती देवींच्या मागे ते पहाडासारखे उभे राहिले. त्यांच्या शिक्षणास राजघराण्यातून ही विरोध झाला पण त्याकडे लक्ष न देता त्यांनी इंदुमती देवींना चांगले शिक्षण दिले. त्यांच्या शिक्षणासाठी शिक्षकांची स्वतंत्रपणे सोनतळी येथे नेमणूक केली. इंदुमती देवी बरोबर आणखी चार मुलींच्या शिक्षणाची सोय त्यांनी केली. राजा असूनही या मुलींच्या शिक्षणासाठी त्यांना शिक्षण देणाऱ्या शिक्षकांच्याकडे ते नतमस्तक झाले.जगातील हे दुर्मिळ उदाहरण आहे. स्त्रियांच्या शिक्षणासाठी आणि स्त्रियांच्या संरक्षणासाठी झटणारा हा खरा राजा होता. राज ऋषी होता.
परिषदेतील दुसऱ्या सत्रात बोलताना कॉम्रेड उमेश सूर्यवंशी यांनी राजर्षी शाहूंच्या कार्याचे वेगळेपण विविध उदाहरणे देऊन मांडले. ते म्हणाले, राजर्षी शाहू महाराजांचा प्रवास हा छत्रपती, लोक राजा ते राजर्षी असा झालेला आहे. शिवाजी महाराजांनी सुरू केलेले शिवशक पेशवेकालात बंद केले होते. ते शाहू महाराजांनी पुन्हा सुरू केले. 1894 च्या मोठ्या दुष्काळात एकही भूक बळी जाऊ दिला नाही. स्वस्त धान्याची दुकाने, रोजगार हमीची कामे त्यांनी सुरू केली. कामावर येणाऱ्या महिलांच्या मुलांसाठी पाळणाघरे सुरू केली. प्लेगच्या साथीमध्ये ही त्यांनी मोठे काम केले. एकही बळी प्लेगमध्ये होऊ दिला नाही. त्यासाठी गावच्या यात्रा जत्रा बंदी केल्या. छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा फुले यांचा विचार त्यांनी पुढे नेला. देशाला संविधान करते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नेतृत्व दिले. कोल्हापूरला कायमचे दुष्काळमुक्त केले. जयसिंगपूर राधानगरी येथे व्यापारपेटा वसवल्या . कोल्हापूरला उद्यम नगरी , शिक्षण काशी , व्यापार नगरी, कलानगरी मल्ल कुस्तीचे केंद्र बनवले. कुस्तीसाठी त्यांनी त्यावेळी तीस हजार रुपये राखून ठेवले. रुस्तुम ए हिंद चे स्वप्न त्यांनी पाहिले. त्यासाठी अनेक महिलांना प्रोत्साहन दिले. देवापा धनगर, आबालाल रहेमान अशा लोकांसाठी ते झटले. कोल्हापूरला त्यांनी शाहू नगरी केले, महाराष्ट्राला फुले शाहू आंबेडकरांचा वारसा दिला.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण म्हणाले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारांचा जागर महाविद्यालयात विविध उपक्रमाद्वारे सुरू आहे.शाहू महाराज यांचा विचार आणि कृती यांचा वारसा वर्तमान काळात कसा जपला जाईल याची जाणीव दोन्ही वक्त्यांनी करून दिली. डॉ.सुनीलकुमार लवटे प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे. त्यांच्याकडून मिळालेल्या प्रेरणेबद्दल त्यांनी ऋण व्यक्त केले.
स्वागत व प्रास्ताविक आणि पाहुण्यांचा परिचय प्राचार्य डॉ.जी.पी.माळी यांनी करून दिला
सूत्रसंचालन प्रा. निशांत गोंधळी यांनी केले. डॉ. विश्वास सुतार यांनी आभार मानले.
श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयातील इतिहास विभाग प्रमुख डॉ. सुरेश शिखरे, डॉ. शिवाजी जाधव ,प्राचार्य डॉ.प्रभाकर हेरवाडे ,प्रा .सी.एम.गायकवाड, जॉर्ज क्रूज , प्रकाश आमटे, अशोक जगताप, संजय कलके, चंद्रकांत निफाडे, बाळासाहेब सुतार, संजय पाटील सुंदरराव देसाई, संशोधक, अभ्यासक विद्यार्थी प्राध्यापक यावेळी उपस्थित होते.
श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे चेअरमन श्री मानसिंग बोंद्रे यांचे या परिषदेला प्रोत्साहन मिळाले.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!