खासदार धनंजय महाडिक यांच्या वाढदिवसानिमित्त बालकल्याण संकुलातील मुलांना अन्नधान्य, कपडे आणि इतर भेटवस्तूंचे झाले वाटप
कोल्हापूर
कळत नकळत त्यांच्या हातून गुन्हे घडले आहेत. काहींची फसवणूक झाली. काहींना त्यांच्या पालकांनी जन्मताच कोंडाळ्यात टाकून दिले. काहीजणांवर लहान वयातच अन्याय झाला. अशा बालकांना समाजाच्या मुख्य धारेत आणण्यासाठी बालकल्याण संकुलातील विश्वस्त आणि कर्मचार्यांकडून सुरू असलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत. त्यांच्या विविध उपक्रमांना नेहमी पाठबळ असेल, असा विश्वास सौ. अंजली विश्वराज महाडिक यांनी व्यक्त केला. खासदार धनंजय महाडिक यांच्या वाढदिवसानिमित्त संकुलातील मुलांना अन्नधान्य, कपडे आणि इतर भेटवस्तू वाटप उपक्रमाप्रसंगी त्या बोलत होत्या.
कोल्हापुरातील मंगळवार पेठ इथल्या बालकल्याण संकुलात, अनाथ मुले, अल्पवयीन गुन्हेगार, अल्पवयीन मुली, चाळीस वर्षापर्यंतच्या विधवा, बेवारस महिला यांना आश्रय दिला जातो. त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातात. अनेक दानशुरांच्या मदतीवर या संस्थेचे कार्य सुरू आहे. खासदार धनंजय महाडिक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांच्या स्नुषा सौ. अंजली विश्वराज महाडिक यांनी एक विशेष उपक्रम राबवला. शनिवारी सायंकाळी सौअंजली विश्वराज महाडिक यांनी बालकल्याण संकुलातील विविध विभागांना भेट दिली. इथल्या मुलांचे आणि मुलींचं शिक्षण, त्यांची दुखं जाणून घेतली. तसंच संस्थेच्या कार्याविषयी माहिती घेतली. त्यानंतर संस्थेच्या सभागृहात झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात विश्वस्त पद्मा तिवले यांनी सौ. महाडिक यांचे स्वागत केले. विभाग प्रमुख तुकाराम कदम, मीना भाले, परीविक्षा अधिकारी सचिन माने यांनी बालकल्याण संकुलाच्या वाटचालीबद्दल माहिती दिली. यावेळी सौ. अंजली विश्वराज महाडिक यांच्या हस्ते संस्थेला दोन लाख रुपयांचे अन्नधान्य, कपडे आणि आवश्यक साहित्य देण्यात आले. अनाथ मुलांसह पीडित- निराधार महिलांना आधार देण्याचे काम प्रामाणिकपणे केले जात आहे. या संस्थेचे विश्वस्त आणि कर्मचार्यांकडून खर्या अर्थानं मानवतेची सेवा होत असल्याचे सौ. अंजली महाडिक यांनी बोलून दाखवले. भविष्यात नेहमीच या संकुलासाठी महाडिक परिवाराचं सहकार्य असेल, असे त्यांनी आश्वासन दिले.