ज्येष्ठ पत्रकार नाना पालकर यांचे निधन
कोल्हापूर/ ज्येष्ठ पत्रकार दिलावरखान आयुबखान मुन्सी पालकर तथा नाना पालकर(वय 78) यांचे आज सोमवार दिनांक 27 जानेवारी रोजी दुपारी येथील खाजगी रुग्णालयात निधन झाले. शनिवारी त्यांना हृदयविकाराचा झटका येऊन मेंदूमध्ये रक्तस्राव झाला होता. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, एक मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
पन्नास वर्षाहून अधिक काळ त्यांनी पत्रकारिता केली. त्यांचे स्वतःचे साप्ताहिक तडजोड होते. याशिवाय दैनिक पुढारी, दैनिक नवाकाळ, साप्ताहिक पोलीस टाईम्स, अशा विविध वृत्तपत्रात त्यांनी पत्रकारिता केली. पत्रकारितेमधील योगदानाबद्दल त्यांना अनेक संस्थांच्या वतीने पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. पत्रकारांच्या राष्ट्रीय पातळीवरील प्रेस क्लब ऑफ इंडियाचे ते बराच काळ सदस्य होते. महाराष्ट्र राज्य अधिस्वीकृती समितीचे त्यांनी विभागीय अध्यक्ष पद भूषवले होते. इंग्लंड आणि अमेरिका येथे त्यांचे काही काळ वास्तव्य होते. याशिवाय जेदाह,मक्का मदिना येथे धार्मिक पर्यटन केले होते.
त्यांची अंत्ययात्रा भाऊसिंगजी रोड गणेश बोळ येथील त्यांच्या निवासस्थानापासून आज सोमवारी सायंकाळी पाच वाजता निघणार आहे.