शिक्षण क्षेत्रातील भीष्माचार्य जो. म. साळुंखे यांचे निधन
प्रतिनिधी:
शिक्षण क्षेत्रातील भीष्माचार्य व राजर्षि शाहू विद्यानिकेतन शिंगणापूरचे माजी प्राचार्य कै. जो. म. साळुंखे (सर) यांचे दुःखद निधन झाले. सरांच्या जाण्याने शिक्षण क्षेत्रात कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे. इचलकरंजी येथे वयाच्या ब्यान्नवव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, तीन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
जोतिराव मशनूराव साळुंखे अर्थात प्राचार्य जो. म. साळुंखे, राजर्षी शाहू छत्रपती विद्यानिकेतन, शिंगणापूर हे नाव कोल्हापूरच्या शैक्षणिक इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरण्यात सिंहाचा वाटा असणारं असं हे एक दुर्मीळ व्यक्तिमत्त्व. त्यांनी वेगवेगळ्या नामांकित ठिकाणी प्राचार्य म्हणून काम केले. शहीद शिक्षण प्रसारक मंडळासह अन्य अनेक शिक्षण संस्थांचे ते मार्गदर्शक होते.
साळुंखे सरांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या प्रेरणेने असंख्य विद्यार्थी घडले. प्रशासकीय, शैक्षणिक, राजकीय, वैद्यकीयच नाही तर असं कोणतंही क्षेत्र नसेल, जिथे विद्यानिकेतनच्या भूमिपुत्रांनी आपला ठसा उमटवला नाही. भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी ज्ञानेश्वर मुळ्ये, जागतिक शिक्षणतज्ञ आणि नॅक चे सल्लागार डॉ. जगन्नाथ पाटील, आयपीएस दिगंबर प्रधान, सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी अनिल पाटील, माजी विभागीय आयुक्त विलास पाटील, डॉ. बबन पाटील, डॉ. कुर्ले, डॉ. वाघ डॉ .अरुण पाटील, डॉ.धनंजय गिरमल यांसारखे नामांकित वैद्यकीय क्षेत्रातील मंडळीसह सर्वच क्षेत्रात भरीव योगदान दिलेले असंख्य विद्यार्थी सरांनी घडवले. अनेकांच्या वैयक्तिक आयुष्यामध्येही सरांचं खूप मोठं योगदान आहे.
रक्षाविसर्जन गुरुवार (दि. २३) रोजी इचलकरंजी स्मशानभूमी येथे आहे.