विवेकानंद संस्थेचे दीपस्तंभ  : मा. प्राचार्य अभयकुमार साळुंखे

Spread the news

विवेकानंद संस्थेचे दीपस्तंभ  : मा. प्राचार्य अभयकुमार साळुंखे

यांचा 80 वा वाढदिवस दि.17.1.2025 रोजी आहे त्यानिमित त्यांच्या कार्याचा आढावा

 

शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी स्थापन केलेली श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था ही एक महाराष्ट्रातील अग्रमानांकित शिक्षण संस्था आहे.  या शिक्षणसंस्थेमुळे अनेक खेडयापाडयातील मुलांच्या शिक्षणाची सोय झाली आहे.  आज या संस्थेचा वटवृक्ष होऊन  406 शाखा महाराष्ट्र व कर्नाटकात  ज्ञानदानाचे पवित्र कार्य करीत  आहेत. अशा या प्रसिध्द संस्थेची धुरा मा. प्राचार्य अभयकुमार साळुंखे  आपल्या गुरुदेव कार्यकर्त्यांच्या साथीने समर्थपणे सांभाळीत आहेत. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली संस्थेच्या विविध शाखांमध्ये एम.बी.ए., एम.सी.ए., लॉ कॉलेज, असे अनेक नवनवीन अभ्यासक्रम सुरु झालेले आहेत. विद्यार्थ्यांच्या सोईसाठी चार नवीन बसेसची सोयही संस्थेमार्फत करण्यात आली आहे.

आजही संस्थेच्या  गुरुदेव कार्यकर्त्यांमध्ये  त्यांच्याबद्दल  आदरयुक्त भीती आहे. कारण त्यांच्या समस्या जाणून घेऊन कर्मचारी वर्गापासून विद्यार्थ्यांपर्यंत अडचणींचे निवारण करणे, विद्यार्थ्याना काही अडचणी येऊ नयेत म्हणून धडपडणारे साहेब साठी इतरांसाठी संस्थाप्रमुख असले तरी गुरुदेव कार्यकर्त्यांसाठी ते कुटुंब प्रमुख आहेत. त्यांच्या कार्यकुशल नेतृत्वामुळेच त्याची प्रतिष्ठा व लोकप्रियता आहे त्यांच्याच मार्गदर्शनाखाली मा.प्राचार्या  सौ शुभांगी गावडे या संस्थेची सेक्रेटरी पदाची समर्थपणे  सांभाळत आहेत. तर मा.कौस्तुभ गावडे हे संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. साहेबांच्या शैक्षणिक कार्याची दखल घेऊन त्यांना अनेक संस्था-संघटनांनी पुरस्कार देऊन गौरविले आहे. नुकताच साहेबांना  शिक्षणक्षेत्रातील मोलाच्या कामगिरीबद्दल स्वर्गीय शंकरराव भांबुरे जीवन गौरव पुरस्कारही मिळाला आहे.

            बापूजींनी लावलेल्या या ज्ञानज्योतीचा प्रकाश शिक्षणाच्या माध्यमातून घराघरातून पोहोचला आहे. ही संस्था एक विवेकानंद ज्ञानपीठ व्हावी व यातून आंतरराष्ट्रीय विद्यार्थी घडावेत त्यासाठी शिक्षकांनी आधुनिक शिक्षण पद्धतीचा अभ्यास करून रोजगाराभिमुख अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना शिकवावेत व त्यांना स्वावलंबी बनवावे. आयुष्याच्या वाटेवरून  चालताना योग्य वाटेवरून जायचं असेल तर ज्ञानाचे आणि चांगल्या विचारांचे महत्त्व खूप मोठे आहे. आणि चांगले विचार ग्रंथातून येतात, यासाठी त्याची आवड वाढवावी. हे विचार आहेत आमच्या संस्थेचे कार्याध्यक्ष मा. प्राचार्य अभयकुमार साळुंखे साहेब यांचे. बापूजींच्या पश्चात संस्थेला प्रगतीपथावर नेण्याचे अवघड काम त्यांनी मोठ्या जिद्दीने, चिकाटीने व सचोटीने अविरतपणे केले आहे व आजही करीत आहेत . 80 व्या वर्षातही त्यांचा उत्साह, उमेद, प्रचंड आशावाद आहे.  आशावादी माणूस इतरांना नेहमी स्फूर्ती देत असतो, त्यामुळे गुरुदेव कार्यकर्ते ही संस्था विकासासाठी मोलाचे योगदान  देत आहेत.

शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या शिक्षण क्षेत्रातील ज्ञान प्रसाराचे कार्य लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करावा अशी साहेबांच्या बरोबरच आम्हा सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे कारण त्यामुळे त्यांच्या कार्याची सर्व समाजासमोर येईल असे वाटते. मा.अभयकुमार साहेबांच्या वाढदिवसानिमित ज्ञानशिदोरी उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना वाचण्यायोग्य पुस्तके एकत्र जमा करुन गरीब विद्यार्थ्यांना वाटणे, रक्तदान शिबीर असे उपक्रम होणार आहेत. यावेळी ज्ञान शिदोरी समारंभात प्रसिध्द लेखक, व्याख्याते व विचारवंत डॉ. अच्युत गोडबोले यांचे विशेष व्याख्यान आयोजित करणेत आले आहे. बापूजींच्या शिकवणीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कार्य करणाऱ्या साहेबांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त उत्तम आरोग्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना.

      श्री. हितेंद्र साळुंखे


Spread the news

You may also like

error: Content is protected !!