Spread the news

जिल्हा बॅडमिंटन संघटनेतर्फे १३ ला विविध कार्यक्रम

संघटनेचे अध्यक्ष सतीश घाटगे यांची माहिती

कोल्हापूर

कोल्हापूर जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त सोमवारी (ता. १३) विविध कार्यक्रम आयोजित केल्याची माहिती असोसिएशनचे अध्यक्ष सतीश घाटगे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली. आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू पद्मश्री प्रकाश पदुकोण, महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनचे मानद सचिव श्रीकांत वाड व पद्मश्री मुरलीकांत पेटकर रेसिडेन्सी क्लबमध्ये सकाळी साडेदहा वाजता खेळाडूंशीसोबत संवाद साधतील, तर सायंकाळी सहा वाजता ज्येष्ठ खेळाडूंचा सत्कार होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

घाटगे म्हणाले, ‘खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी असोसिएशन सातत्याने प्रयत्न करत आहे. एकाच छताखाली किमान सहा ते सात कोर्टस् तयार व्हावेत, यासाठी असोसिएशन प्रयत्नशील आहे. सुमारे ५० वर्षांपूर्वी बाबासाहेब नाडगोंडे, हिंमतसिंह घाटगे, विक्रमसिंह घाटगे, बाबा भोसले, मेजर पी. वाय. सोवनी, सरदार मोमीन यांनी बॅडमिंटन असोसिएशनची स्थापना करून खेळाचा पाया रचला. मुंबईचे नारायणदास रूपारेल, सुशीलकुमार रुईया, पुण्याचे अण्णासाहेब व दाजी नातू यांनी असोसिएशनच्या उभारणीत मोलाची साथ दिली.’

ते पुढे म्हणाले, ‘कोल्हापुरात जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्तरावरील

अनेक स्पर्धा झाल्या आहेत. प्रकाश पदुकोण यांनी कोल्हापुरात खेळ केला आहे. कोल्हापुरातील शोभा मूर्ती यांना अर्जुन, तर मयूर तावडे यांना शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित केले आहे. असोसिएशनच्या या वाटचालीचा आढावा स्मरणिकेतून घेण्यात आला असून, त्याचे प्रकाशन होणार आहे. तसेच असोसिएशनच्या वेबसाईटचे उद्घाटन केले जाणार आहे.’

पत्रकार परिषदेस तन्मय करमरकर, विनोद भोसले, सुमित चौगुले, चंद्रशेखर सोवनी, साईदास खाणगाव, अरुणा रसाळ, जगदीश काणे, देविना घाटगे, योगिनी कुलकर्णी उपस्थित होते.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!