कोल्हापूर : सर्वसामान्य जनतेने साथ दिल्यानेच पुन्हा एकदा राज्यात भाजप सरकार आले आहे. कोल्हापूरकरांनी माझ्यावर अतोनात प्रेम केले त्यामुळे कोल्हापूरचे पालकत्व मी स्वीकारणारच आहे अशावेळी पक्षाने पालकमंत्री पदाची जी जबाबदारी दिली ती व्यवस्थित पार पाडू असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
मंत्रिपद स्वीकारल्यानंतर ते प्रथमच कोल्हापुरात दाखल झाले. त्यांचे नागाळा पार्कातील भाजप कार्यालयात पक्ष आणि नागरिकांनी जल्लोषात स्वागत केले. दरम्यान सकाळी रेल्वेस्थानकावरही दादांचे जंगी स्वागत करण्यात आले शहरात अनेक ठिकाणी त्यांच्या स्वागताचे फलक लावण्यात आले आहेत.
मंत्री पाटील म्हणाले, कोणत्याही जिल्ह्याचा पालकमंत्री झालो तरीही कोल्हापूरला काहीही कमी पडू देणार नाही. कोल्हापूरसोबतची नाळ कायम असल्याने कायमस्वरूपी लक्ष राहील.
यावेळी विविध
संस्था, संघटना आणि नागरिकांतर्फे त्यांचे स्वागत करण्यात आले. माजी मंत्री भरमू सुबराव पाटील, खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, प्रदेश सचिव महेश जाधव, जिल्हाध्यक्ष विजय जाधव, माजी आमदार सुरेश हाळवणकर, राहुल चिकोडे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजवर्धन निंबाळकर, संगीता खाडे, जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, उद्योजक संजय पाटील, विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष अभयकुमार साळुंखे, प्राचार्य डॉ. क्रांतिकुमार पाटील, डॉ. डी. आर. मोरे, व्ही. एम. पाटील, सुरेश गवळी, अरुण इंगवले, प्रा. जयंत पाटील, विवेकानंद शिक्षण संस्थेचे सीईओ कौस्तुभ गावडे, धनश्री तोडकर, गायत्री राऊत, आशिष ढवळे, बाबा पार्ट, किशोर घाटगे, राहुल चव्हाण, आदींनी शुभेच्छा दिल्या.