आर. एम. मोहिते यांना साश्रु नयनांनी निरोप
विविध क्षेत्रातील मान्यवरांनी घेतले अंत्यदर्शन, अनेकांनी दिला आठवणींना उजाळा
कोल्हापूर
बांधकाम, शिक्षण, उद्योग यासह सामाजिक, क्रीडा क्षेत्रातील ख्यातनाम व्यक्तिमत्त्व असलेल्या उद्योगपती आर. एम. मोहिते यांना शुक्रवारी साश्रू नयनांनी निरोप देण्यात आला. पंचंगंगा स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
शिक्षणाची उपाधी, संपत्तीची साथ किंवा सत्तेचे पाठबळ नसतानाही ग्रामीण भागात व सामान्य कुटुंबात जन्मलेला एखादा माणूस जिद्दीच्या, कष्टाच्या आणि निष्ठेच्या जोरावर राष्ट्रीय पातळीवरचा यशस्वी उद्योजक म्हणून नावलौकिक मिळवू शकतो, याचे ज्वलंत व जिवंत उदाहरण म्हणून रामचंद्र मारुती मोहिते यांचा उल्लेख केला जातो. अतिशय कष्टातून आयुष्य उभं करताना मोहिते यांनी केवळ बांधकामच नव्हे तर इतर अनेक क्षेत्रात भरीव कामगिरी केली. ज्या ज्या क्षेत्रात त्यांनी प्रवेश केला, त्या सर्वामध्ये यश मिळविले. मोहिते उद्योग समुहाचे नाव केवळ महाराष्ट्रच नव्हे तर भारतभर पसरवले.
बांधकाम, शिक्षण, सामाजिक, क्रीडा अशा अनेक क्षेत्रात उत्तुंग कामगिरी केलेल्या मोहिते यांचे गुरूवारी निधन झाले. शुक्रवारी सकाळी त्यांच्यावर पंचगंगा स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी माजी मंत्री प्रकाश आवाडे, डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती संजय डी. पाटील, माजी आमदार ऋतुराज पाटील, उद्योगपती संजय घोडावत, व्ही.बी. पाटील, लोकमतचे संपादक वसंत भोसले, माजी महापौर सुनील कदम, चेंबर ऑफ कॉमर्सचे कोल्हापूरचे अध्यक्ष संजय शेटे, महावीर गाट, सतीश घाटगे, मोहन घाटगे, माजी नगरसेवक आनंद माने, राजू लाटकर, भरत जाधव, संजय पाटील, पार्श्वनाथ बँकेचे कार्यकारी अध्यक्ष शंकर पाटील, माजी उपमहापौर अर्जुन माने, मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकर, बाबा जांभळे, दिलीप देसाई, भीमा बिल्डर्सचे अभिजीत मगदूम, संजय काटकर, माणिक पाटील चुयेकर, शिवाजीराव चव्हाण यांच्यासह शासकीय अधिकारी, सामाजिक, औद्योगिक, शिक्षण, सामाजिक व क्रीडा क्षेत्रातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दिवसभर विविध क्षेत्रातील अनेकांनी दिलीप मोहिते, शिवाजी मोहिते, अभिषेक माहिते, शंतनू माहिते, ध्रुव मोहिते यांची भेट घेऊन सात्वंन केले. यावेळी अनेकांनी मोहिते यांच्या सोबतच्या अनेक आठवणींना उजाळा दिला.