मंत्री हसन मुश्रीफ यांचे कोल्हापुरात होणार जंगी स्वागत
शनिवारी निघणार भव्य मोटर सायकल रॅली, गैबी चौकात होणार नागरी सत्कार
कोल्हापूर : मंत्री झाल्यानंतर प्रथमच कोल्हापुरात येणाऱ्या हसन मुश्रीफ यांचे शनिवारी जंगी स्वागत करण्याचा निर्णय शहर व जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला. कावळा नाका ते राजर्षी शाहू समाधीस्थळपर्यंत मोटारसायकल रॅली काढण्यात येणार आहे. तसेच सायंकाळी पाच वाजता कागल येथील गैबी चौकात त्यांचा नागरी सत्कार करण्यात येणार आहे.
कागल मतदार संघातून षटकार मारत मंत्री मुश्रीफ हे निवडून आले. त्यानंतर त्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. अधिवेशन संपल्यानंतर शनिवारी ते कोल्हापुरात येत आहेत. मंत्री झाल्यानंतर ते प्रथमच कोल्हापुरात येणार असल्याने त्यांचे जंगी स्वागत करण्यात येणार आहे. यासाठी आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील म्हणाले, मुश्रीफ हे साहेबांना आमदार म्हणून निवडून आले आहेत. तर आतापर्यंत त्यांनी नऊ वेळा मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. 21 डिसेंबर रोजी ते कोल्हापुरात येत आहेत त्यांचे महायुतीतर्फे जंगी स्वागत व रॅली काढण्यात येणार आहे. कावळा नाका येथे त्यांचे सकाळी साडेनऊ वाजता आगमन होईल. याप्रसंगी महायुतीचे सगळे खासदार आमदार व स्थानिक स्वराज्य संस्थेतील लोकप्रतिनिधी यांची प्रमुख उपस्थित असणार आहेत. कावळा नाका येथून सकाळी दहा वाजता मोटार सायकल रॅलीला सुरुवात होईल.
राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आदिल फरास म्हणाले, कावळा नाका इथून सकाळी दहा वाजता मोटार सायकल रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीमध्ये एक हजार मोटार सायकल असतील. मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन करण्यात येणार आहे. कावळा नाका दाभोळकर चौक स्टेशन रोड दसरा चौक बिंदू चौक शिवाजी चौक ते अंबाबाई मंदिर अशी मोटार सायकल रॅली निघेल. करवीर निवासिनी अंबाबाईदेवीचे दर्शन घेतल्यानंतर मंत्री मुश्री पे शाहू समाधीस्थळ येथे राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन करणार आहेत. शाहू समाधीस्थळ येथे मोटार सायकल रॅलीची सांगता होईल. मुश्रीफ यांच्या स्वागत सोहळ्यात दहा हजारहून अधिक नागरिक व कार्यकर्त्यांना सहभाग असेल.
जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक प्रताप माने म्हणाले, मंत्री मुश्रीफ यांचा कागल मतदार संघातर्फे सायंकाळी पाच वाजता बेबी चौक येथे नागरी सत्कार करण्यात येणार आहे. याचबरोबर सकाळी कोल्हापुरात मोटरसायकल रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीद्वारे मंत्री प्रकाश आबिटकर यांचेही स्वागत करण्याचे नियोजन आहे. मंत्री आबिटकर यांची वेळ मिळाल्यास महायुतीतर्फे दोन्ही मंत्र्यांचे स्वागत केले जाईल.
पत्रकार परिषदेवेळी गोकुळचे संचालक युवराज पाटील, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक रणवीरसिंह गायकवाड, राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष अनिल साळोखे,आसिफ फरास, महिला आघाडीच्या शितल फराकटे, जहिदा मुजावर आदी उपस्थित होते.