खासदार धनंजय महाडिक यांनी घेतली केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट, कोल्हापूरच्या रेल्वे प्रश्नांकडे वेधले लक्ष*

Spread the news

*खासदार धनंजय महाडिक यांनी घेतली केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट, कोल्हापूरच्या रेल्वे प्रश्नांकडे वेधले लक्ष*

नवी दिल्ली

सध्या संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी नुकतीच केंद्रीय रेल्वेमंत्री नामदार अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. त्यातून खासदार महाडिक यांनी कोल्हापूरशी निगडित रेल्वे प्रश्नांबद्दल नामदार वैष्णव यांच्याशी चर्चा केली. सध्या कोल्हापुरातून मुंबईला जाणाऱ्या सर्वच रेल्वे गाड्या, गांधीनगर म्हणजेच वलिवडे स्थानकावर थांबत नाहीत. गांधीनगर मधील स्थानिक रहिवासी आणि व्यापारी – उद्योजक यांची सोय लक्षात घेऊन, सर्व एक्सप्रेस गाड्यांसाठी पुन्हा गांधीनगरचा थांबा सुरू करावा, अशी मागणी खासदार महाडिक यांनी केली. तसेच मिरज ते कोल्हापूर रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचे काम अधिक गतीने व्हावे, याकडे खासदार महाडिक यांनी लक्ष वेधले. दुहेरीकरणासाठी आवश्यक भूसंपादन झाले नसल्याने हे काम रेंगाळले आहे, असे नामदार वैष्णव यांनी स्पष्ट केले. त्यावर कोल्हापूर जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून भूसंपादन प्रक्रिया गतिमान करण्यासाठी प्रयत्न करण्याचे अभिवचन खासदार महाडिक यांनी दिले. दरम्यान कोल्हापूर शहरातील बाबुभाई परिख पूल अत्यंत जुना, जीर्ण झाला असून, वाहतुकीसाठी अपुरा पडत आहे. त्यामुळे बाबुभाई परीख पूलाला समांतर नवा पूल बांधावा, किंवा नवा उड्डाणपूल बांधावा अशी मागणी, खासदार महाडिक यांनी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडे केली. याबाबत रेल्वे अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेऊन योग्य तो उपाय केला जाईल, असे नामदार वैष्णव यांनी स्पष्ट केले. याशिवाय वंदे भारत एक्सप्रेस आणि सह्याद्री एक्सप्रेस मुंबई पर्यंत न्यावी, अशी विनंती खासदार महाडिक यांनी केली. कोल्हापूरशी निगडित रेल्वेचे प्रश्न प्राधान्याने लक्ष घालून सोडवले जातील, अशी ग्वाही नामदार अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!