‘स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन हे नाविन्यपूर्ण शोध व सर्जनशीलतेचे व्यासपीठ ‘- रमेश घरमळकर
के. आय. टी. मध्ये राष्ट्रीय स्तरावरील अंतिम स्पर्धेचे उद्घाटन
विद्यार्थ्यांच्या कल्पक व सृजनशील विचारशक्तीची कसोटी म्हणजेच ‘स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन’ ही देशपातळीवरील स्पर्धा! ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन, शिक्षण मंत्रालयाचा इनोव्हेशन सेल व शिक्षण मंत्रालय भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच रेल्वे मंत्रालय, पर्यावरण मंत्रालय यासारख्या अन्य काही महत्त्वाच्या मंत्रालयांच्या सहकार्याने आयोजित स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन ही तरुणाईच्या सृजनशील कल्पनेला व वैचारिक क्षमतेला आव्हान देणारी एक राष्ट्रीय स्पर्धा आहे. या स्पर्धेच्या अंतिम फेरीचे उद्घाटन आज बुधवार दि. ११ डिसेंबर २०२४ रोजी के आय टी अभियांत्रिकी (स्वायत्त ) महाविद्यालय येथे श्री. रमेश घरमळकर, संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारीआर स्क्वेअर सॉफ्ट टेक्नॉलॉजिज, पुणे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाविद्यालयाचे संचालक व नोडल केंद्र प्रमुख डॉ. मोहन वनरोट्टी यांनी पाहुण्यांचे, स्पर्धक विद्यार्थी, मेंटॉर व परीक्षक यांचे स्वागत केले. आपल्या स्वागतपर भाषणात ते म्हणाले, “कोल्हापूर हे निसर्गाच्या कोंदणात वसलेले, ऐतिहासिक, भौगोलिक व सामाजिक वारसा लाभलेले आणि दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध पावलेले शहर. आमचे के आय टी महाविद्यालय हे उच्च शैक्षणिक दर्जाबरोबरच उद्योजकता व स्टार्ट अप यांना देण्यात येणाऱ्या प्रोत्साहनासाठी ओळखले जाते. मागील दोन वर्षात आमच्या महाविद्यालयाने उत्कृष्टरित्या ह्या स्पर्धेचे नियोजन केले, त्याची एआयसीटीई ने दखल घेऊन महाविद्यालयाची प्रशंसा केली आणि सलग तिसऱ्या वर्षी ही स्पर्धा आयोजित करण्याचा बहुमान आमच्या कॉलेजला मिळाला अशी त्यांनी माहिती दिली.
विद्यार्थ्यांना संबोधित करताना मुख्य अतिथी रमेश घरमळकर यांनी स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन हे नाविन्यपूर्ण शोध व सर्जनशीलतेचे व्यासपीठ असल्याचे सांगत आर्टिफिशियल इंटेलिजन्स इंटेलिजन्स सारख्या तंत्रज्ञानामुळे आपले जीवन रोज बदलत आहे त्याचप्रमाणे नवनवीन समस्या समोर येत आहेत या समस्यांना सोडवण्यासाठी विद्यार्थ्यांनी पारंपारिक चौकटीबाहेर विचार करून सोल्युशन विकसित केले पाहिजे व हे जग सुंदर बनवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत अशी अपेक्षा व्यक्त केली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री साजिद हुदली यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. ते पुढे म्हणाले कि अमेरिका, चीन, जर्मनी यासारखे देश वेगवेगळ्या क्षेत्रातील त्यांनी केलेल्या प्रगतीमुळे ओळखले जातात तर अगदी प्राचीन काळी आर्यभट्ट पासून ते आता सिलिकॉन व्हॅली मधील क्रांती पर्यंत भारत हा संकल्पनांचा प्रदेश त्यामुळे आपला देश भारतीयांच्या प्रज्ञेमुळे ओळखला जातो. स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन हे औद्योगिक सार्वजनिक सरकारी प्रशासकीय क्षेत्रे व कल्पक सर्जनशील विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता यांना एकत्र आणणारे व्यासपीठ. के आय टी ने सातत्याने गुणवत्तापूर्ण शिक्षण व इतर उपक्रम राबवले आहेत तसेच मागील दोन वर्षात या स्पर्धेचं अचूक नियोजन केल्यामुळे ए.आय.सी.टी.ई.चे उपाध्यक्ष व भारत सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाचे इनोव्हेशन ऑफिसर असणारे डॉ. अभय जेरे हे प्रत्यक्ष या नोडल सेंटर ला भेट देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रम प्रसंगी ए.आय.सी.टी.ई. चे निरीक्षक श्री. उमेश राठोड व श्री. प्रसाद दिवाण, संस्थेचे सचिव श्री. दीपक चौगुले व विश्वस्त श्री. सुनील कुलकर्णी, स्पर्धेhचे परीक्षक व स्पर्धक विद्यार्थी व मेंटॉर्स उपस्थित होते. या कार्यक्रमाचे नियोजन स्पर्धेचे नोडल सेंटर इन्चार्ज प्रा.अरुण देसाई व नोडल सेंटर इन्चार्ज एस. पी. ओ. सी. प्रा.अजय कापसे हे करत आहेत. उद्घाटन समारंभाचे सूत्रसंचालन प्रा. श्रुती काशीद यांनी केले. याप्रसंगी विविध विभागांचे प्रमुख, अधिष्ठाता, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.