ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि श्रीलंका टेक्नॉलॉजी कॅम्पस, पदुक्का, श्रीलंका यांच्या वतीने शैक्षणिक आणि संशोधन सहकार्याचा नवीन अध्याय
पुणे
ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि श्रीलंका टेक्नॉलॉजी कॅम्पस, पदुक्का, श्रीलंका यांच्या वतीने शैक्षणिक आणि संशोधन सहकार्याचा नवीन अध्याय सुरू करण्यात आला. या दोन संस्थांदरम्यान सामंजस्य करार (MoU) करण्यात आला. हा करार डिजिटल पद्धतीने डॉ. पी. बी. माने (प्राचार्य, एआयएसएसएमएस इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी) आणि डॉ. वेरंजा करुनारत्ने (उपकुलगुरू, श्रीलंका टेक्नॉलॉजी कॅम्पस, पदुक्का, श्रीलंका) यांनी स्वाक्षरी करून केला. या MoU च्या सर्व प्रक्रियांचे समन्वय डॉ. मीनाक्षी ए. थलोर (डीन, इंटरनॅशनल पार्टनरशिप सेल, एआयएसएसएमएस आयओआयटी, पुणे) यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. श्री मालोजीराजे छत्रपती, मानद सचिव, ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरिअल सोसायटी यांनी या करारा साठी शुभेच्छा दिल्या.
या करारामुळे दोन्ही संस्थांमध्ये शैक्षणिक आणि संशोधनात्मक देवाणघेवाण अधिक मजबूत होईल. विद्यार्थ्यांसाठी आणि प्राध्यापकांसाठी शैक्षणिक आदानप्रदान, संयुक्त संशोधन, तसेच परिषदा आणि चर्चासत्रे यांसारख्या विविध उपक्रमांची आखणी करण्यात आली आहे, ज्यामुळे जागतिक शैक्षणिक समुदाय निर्माण करण्याच्या दिशेने पुढे जाण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
MoU मधील महत्त्वपूर्ण उपक्रम:
१. शैक्षणिक व प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थ्यांची देवाणघेवाण:
या उपक्रमामुळे प्राध्यापकांना संशोधन प्रकल्पांवर एकत्र काम करण्याची संधी मिळेल. तसेच, वेगवेगळ्या क्षेत्रातील चांगल्या शिक्षण पद्धतींचा आदानप्रदान होईल, ज्यामुळे नवनवीन दृष्टिकोनांचा विकास होईल.
२. विद्यार्थ्यांची देवाणघेवाण व परदेशी शिक्षण कार्यक्रम:
विद्यार्थ्यांना परदेशी शैक्षणिक प्रणालीचा अनुभव घेण्याची आणि जागतिक दृष्टिकोन विकसित करण्याची संधी मिळेल. यामुळे त्यांचे शिक्षण अधिक व्यापक होईल.
३. संयुक्त संशोधन व विकास:
दोन्ही संस्थांच्या तज्ज्ञतेचा लाभ घेत, जागतिक स्तरावर महत्त्वाचे संशोधन आणि शैक्षणिक योगदान देण्याचा प्रयत्न केला जाईल.
४. व्याख्याने, चर्चासत्रे आणि परिषदा:
संयुक्त व्याख्याने आणि चर्चासत्रे आयोजित करून विविध क्षेत्रांतील विचारवंत आणि तज्ज्ञांशी संवाद साधण्याची संधी मिळेल. तसेच, शैक्षणिक क्षेत्रातील नवीन प्रवाह आणि आव्हानांवर चर्चा केली जाईल.
५. शैक्षणिक माहिती व साहित्याची देवाणघेवाण:
या देवाणघेवाणीतून दोन्ही संस्थांतील प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांना अद्ययावत शिक्षण साधनांचा लाभ होईल, ज्यामुळे शिक्षण व संशोधनाची गुणवत्ता अधिक सुधारेल.
या सामंजस्य करारामुळे दोन्ही संस्थांनी शैक्षणिक आणि संशोधनाच्या क्षेत्रात परस्पर सहकार्याचा आदर्श निर्माण केला आहे.