गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळेंच्या ताकतीमुळे आबिटकरांना राधानगरीत मोठे बळ !
कागल, करवीर मधील जुळण्याही पडल्या महायुतीला उपयोगी
कोल्हापूर :
राधानगरी मतदार संघातील महाविकास आघाडीचे अनेक नेते एकत्र आल्याने एकाकी पडलेल्या महायुतीच्या आमदार प्रकाश आबिटकर यांना बळ देण्याची अतिशय मोलाची जबाबदारी गोकुळ दूध संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी बजावली. राधानगरी बरोबरच कागल आणि करवीर मतदार संघातही त्यांनी काही जुळण्या लावल्या आणि तेथेही महायुतीच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
राधानगरी-भुदरगड विधानसभा मतदारसंघांची निवडणूक यंदा वैशिष्ट्यपूर्ण ठरली. या निवडणुकीत शिवसेना विरुद्ध शिवसेना
अशी लढत झाली. महायुतीतंर्गत शिवसेनेचे उमेदवार आमदार प्रकाश आबिटकर यांच्या विरोधात राधानगरी तालुक्यातील राष्ट्रीय काँग्रेसचे सर्व बडे नेते, बिद्री भोगावतीचे आजी-माजी संचालक, तालुक्यातील गोकुळचे तीन संचालक महाविकास आघाडीच्या बाजूला गेले.
राधानगरी तालुक्यात शिवसेनेचे आमदार आबिटकर एकाएकी पडल्याचे चित्र निर्माण झाले होते. मात्र गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांची आमदार आबिटकर यांना भक्कम साथ दिली. डोंगळे गट, त्यांना मानणारा वर्ग यांच्या भक्कम पाठिंब्यामुळे आबिटकर यांच्या मताधिक्क्यात
भर पडली. आबिटकर यांच्या विजयाच्या हॅट्रटिकमध्ये गोकुळचे चेअरमन डोंगळे यांचा वाटाही मोलाचा ठरला. कागल मतदारसंघातही डोंगळे यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विजयात योगदान दिले.
राधानगरीमध्ये डोंगळे यांना मानणारा मोठा वर्ग आहे. समाजकारण, राजकारण, सहकार, दूध संस्था या माध्यमातून डोंगळे यांचे उत्तम नेटवर्क आहे. यामुळे या मतदारसंघात डोंगळे यांची भूमिका नेहमीच महत्वपूर्ण ठरली आहे. राधानगरी –भुदरगड मतदारसंघात यंदा विधानसभेची निवडणूक कमालीची प्रतिष्ठेची बनली होती. आमदार आबिटकर यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे
गटातर्फे बिद्रीचे चेअरमन के. पी. पाटील यांनी शड्डू ठोकला होता. निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाल्यावर मतदारसंघातील वातावरण आरोप, प्रत्यारोपांनी ढवळले. राधानगरीतील मातब्बर मंडळी के. पी. पाटील यांच्या बाजूने झुकले होते.
दरम्यान डोंगळे यांनी आमदार आबिटकर यांची कार्यशैली, विकासाचा दृष्टिकोन आणि मतदारसंघासाठी काम करण्याचा झपाटा पाहून त्यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. आमदार आबिटकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वीच गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी त्यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. महायुतीच्या पाठीमागे आपली ताकद उभा केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव असलेले त्यांचे सुपुत्र
अभिषेक डोंगळे यांनीही आपले सहकारी आणि युवाशक्तीच्या सहकार्याने मतदार संघात प्रचाराचे रान उठवून आबिटकर यांच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला.
चेअरमन अरुण डोंगळे हे गेली पस्तीस वर्षे गोकुळच्या सत्तेत आहेत. राधानगरी -भुदरगड मधील वाड्या वस्त्यावर त्यांनी शेकडो दूध संस्था स्थापन करून कार्यकर्त्यांची जाळे विणले आहे.
एखाद्या निवडणुकीत भाग घेतला की झोकून देऊन काम करणे, पदरमोड करून उमेदवारासाठी यंत्रणा राबवणे, स्वतः उमेदवार समजून निवडणूक काळात अहोरात्र पायाला भिंगरी बांधून राबणे ही त्यांची स्वभाव वैशिष्ट्ये आहेत. यंदाच्या निवडणुकीतही त्यांनी आबिटकर यांना पाठिंबा दिला शिवाय अनेक ठिकाणी सभा गाजविल्या. मतदारसंघाच्या विकासासाठी आबिटकर हेच योग्य नेतृत्व आहे हे मतदारांवर बिंबविले.
त्यांचे पुत्र अभिषेक डोंगळे यांच्या युवाशक्तीचे शेकडो कार्यकर्ते हे प्रकाश आबिटकर यांच्या प्रचारात आघाडीवर होते. यामुळे आबिटकर यांना राधानगरी मध्ये मताधिक्य मिळणे सुलभ झाले.
२०१९ ची विधानसभा निवडणूक लढविलेले व बिद्रीचे संचालक राहुल देसाई, बिद्रीचे संचालक सत्यजित जाधव, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य जीवन पाटील, गोकुळचे संचालक किसन चौगुले हे सर्वजण केपींच्या बाजूला गेले असताना डोंगळे यांनी आमदार आबिटकर यांच्या
पाठीशी राहण्याचा निर्णय घेतला. गटाची संपूर्ण ताकत त्यांच्या पाठीशी उभी केली. प्रचारात स्वत; सहभाग घेतला आणि आमदार आबिटकर यांच्या विजयाला मोठा हातभार लावला. केवळ राधानगरीत नव्हे तर कागल तालुक्यात ही त्यांनी अनेक जुळण्या लावल्या आमदार मुश्रीफ यांच्यासाठी या जुळण्या उपयोगी पडल्या करवीर तालुक्यात चंद्रदीप नरके यांच्यासाठी ही त्यांनी मोलाची कामगिरी बजावली