वसंतराव मुळीक यांचा राजेश क्षीरसागर यांना पाठिंबा कोल्हापूर
उत्तर मध्ये वाढली क्षीरसागर यांची ताकद
कोल्हापूर : मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांना पाठिंबा जाहीर केला. रविवारी सायंकाळी त्यांनी या निर्णयाची माहिती दिली. महायुतीचे उमेदवार क्षीरसागर व पक्ष निरीक्षक उदय सावंत यांनी मुळीक व सहकाऱ्यांचे स्वागत केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे धडाडीने काम करणारे नेतृत्व आहे. मराठासह इतर समाजाच्या विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी त्यांनी जे निर्णय घेतले आहेत त्यांची कार्यपद्धती पाहून आपण या निवडणुकीत महायुतीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. गेली 40 वर्षे मी समाजकारणात आहे. विविध समाज घटकाशी मला जवळचा संबंध आहे. हा निर्णय घेण्या अगोदर मी अनेकांशी चर्चा केली. मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासह कोल्हापूर शहराच्या विकास कामासाठी त्यांनी चालना दिली यामुळे आपण महायुती सोबत राहण्याचा निर्णय घेतला. राजेश क्षीरसागर यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणू असे मुळीक यांनी सांगितले. प्रजासत्ताक सामाजिक सेवा संस्थेची दिलीप देसाई यांनीही राजेश क्षीरसागर यांना पाठिंबा दिला. मराठा आरक्षणासंबंधु सरकारची भूमिका सकारात्मक आहे. त्यामुळे आपण पाठिंबाचा निर्णय घेतला असेही ते म्हणाले. यावेळी मराठा महासंघाचे अवधूत पाटील आदी उपस्थित होते. दरम्यान वसंतराव मुळीक यांनी कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात अपक्ष्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. काँग्रेसकडून निवडणूक लढण्यासाठी ते इच्छुक होते. मात्र त्यांना उमेदवारी मिळाली नव्हती. त्यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला होता. अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला होता.