शिवसेना , राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडण्याचे पाप भाजपचे
मदन कारंडे यांचा आरोप
इचलकरंजी : राज्यामध्ये शिवसेनेचे बोट धरून भारतीय जनता पार्टी मोठी झाली. परंतु, त्यांच्याच पाठीत खंजीर खुपसत विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे अनेक उमेदवार पाडण्याचे काम भाजपने केले. त्यांच्या याच करणाम्याने महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा उदय झाला. कोरोनाच्या महामारीत तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी चांगले काम केले तीच परिस्थिती राहिली तर लोकसभेला भाजपचे खासदार कमी येतील या भावनेनेच शिवसेना व नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडण्याचे पाप भाजप सरकार केले असल्याचा आरोप मदन कारंडे यांनी केला.
इचलकरंजी येथील महेश क्लब येथे एस. एम साहेब प्रेमी ग्रुपच्या वतीने जाहीर पाठिंबा व मेळाव्याचे आयोजन केले होते. त्यावेळी मदन कारंडे बोलत होते. ते पुढे म्हणाले, भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणावरूनच जनतेने त्यांना लोकसभेला त्यांची जागा दाखवून दिली. त्यामुळेच महायुती सरकारला लाडकी बहिणी योजना आठवली असेही त्यांनी शेवटी नमूद केले.
जागृती यंत्रमाग संघटनेचे अध्यक्ष विनय महाजन म्हणाले, गेला विधानसभा निवडणुकीच्या आधी आमदार प्रकाश आवाडे यांनी शहरात एक स्टंटबाजी केली होती. भंगारात निघालेले यंत्रमाग व्यवसायाची समस्या मीच सोडवू शकतो असे म्हणून ते आमदार म्हणून निवडून आले. परंतु, पाच वर्षात यंत्रमाग व्यवसायची एकही समस्या त्यांना सोडवता आली नाही, असा आरोप यंत्रमाग जनजागृतीचे अध्यक्ष विनय महाजन यांनी केली.
आवाडे हे हिंदुतत्ववादी आहेत असे सांगत आहेत. सण 2009 ला हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर आवाडे यांनीच लाठीचार्ज करायला लावला होता. यामध्ये हाळवणकर घरात घुसून त्यांच्या वयोवृद्ध मातोश्री यांनाही मारहाण झाली होती ते हाळवणकर यांनी विसरू नये.
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी 2019 ला झालेल्या जाहीर सभेमध्ये निवडणुकीनंतर प्रकाश आवाडे यांना बेड्या घालून जेल मध्ये टाकणार असे जाहीर वक्तव्य केले होते. कारण आवाडे यांनी इचलकरंजीत मेगा कलस्टर मधील आय.पी.एम.सी कंपनी बुडवून फ्रॉड केला आहे. त्यामुळेच निवडून येताच त्यांनी भाजपला साथ दिल्याचे ही त्यांनी शेवटी नमूद केले. यावेळी सागर चाळके, विनय महाजन, माजी आमदार राजीव आवळे, रोहित पाटिल, हिंदुराव शेळके, प्रकाश मोरबाळे, शितल दत्तवाडे, रणजीत जाधव, राजू आलासे, सलीम शिरगावे , सूरज दुबे इत्यादी सह अनेक महिला, कार्यकर्ते उपस्थित होते.