तीन महिन्यात गोकुळमध्ये सत्तांतर होणार – खासदार धनंजय महाडिक*

Spread the news

*तीन महिन्यात गोकुळमध्ये सत्तांतर होणार – खासदार धनंजय महाडिक*

कोल्हापूर – गोकुळ दूध संघाच्या काही नेत्यांनी विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात महायुती सरकारच्या पाठीशी असल्याचे भासवले. तरीही, दक्षिण विधानसभा मतदारसंघात त्यांची भूमिका वेगळी असल्याचे दिसून येत आहे. कर्मचारी, दूधसंस्था यांना दमदाटी करण्याचे प्रकार समोर येत आहेत, मात्र आपण घाबरून न जाता योग्य तो निर्णय घ्या. पुढच्या तीन महिन्यात गोकुळ मध्ये सत्तांतर होणार आहे, असा विश्वास राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला.

खेबवडे येथे कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार अमल महाडिक यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते नागरिकांशी संवाद साधत होते. “गोकुळच्या या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांच्या भेटी घेऊन आम्ही तुमच्या सोबत आहोत, असे सांगितले. महायुतीच्या सर्व उमेदवारांना ताकदीने निवडून देऊ अशी ग्वाही त्यांनी दिली. आता हेच नेते दक्षिण मधील गोकुळचे कर्मचारी, दूधसंस्थांचे संचालक यांना दमदाटी करत आहेत.” असे त्यांनी सांगितले.

“गोकुळमध्ये सुरु असणारा गैरकारभार पूर्वीच उघडकीस आला असता. पण आता विधानसभा निवडणुकीनंतर या सगळ्या प्रकारांचा निकाल लागणार आहे. तीन महिन्यानंतर मात्र गोकुळची सूत्रे सत्ताधाऱ्यांच्या हाती राहणार नाहीत. नव्या उमेदीने नव्या लोकांकडे हा कारभार जाणार आहे. तेव्हा अशाप्रकारे दबावतंत्र वापरून राजकारण करू पाहणाऱ्यांना याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा महाडिक यांनी यावेळी दिला.

ते म्हणाले, गोकुळ दूध संघाचे कोल्हापूरात आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक असे महत्त्व आहे. हजारो कोटींची आर्थिक उलाढाल असलेल्या गोकुळ दूधसंघाला जिल्ह्याच्या राजकारणात अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे कर्मचारी व दूध संस्थांनी घाबरून न जाता महायुतीच्या पाठीशी उभे राहावे. राज्यात पुन्हा एकदा महायुतीचेच सरकार स्थापन होणार आहे. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

केंद्र व राज्यशासनाच्या सर्व योजनांचा लाभ तळागाळातील घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही पूर्णतः कटिबद्ध आहोत. शेतकऱ्यांसह जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी महायुती सरकार कार्यरत आहे. जिल्ह्यातील शेतकरी विरोधी, त्यांच्यावर अत्याचार करून सत्तेचा माज दाखवणाऱ्या लोकांना घरी पाठवण्याची ही वेळ आहे. त्यांना घाबरण्याचे काही कारण नाही. सरकार तुमच्या पाठीशी आहे आणि सदोदित उभे राहील, असे अभिवचन त्यांनी यावेळी दिले.

दरम्यान गावागावांमध्ये असणाऱ्या गोकुळच्या सर्व भागधारकांच्या कल्याणासाठी आम्ही आजपर्यंत काम केले आहे. त्यामुळे या सर्वांचा विश्वास व पाठिंबा आमच्या सोबत आहे. सध्या सुरु असलेल्या प्रकारांमुळे त्यांना सत्ताधाऱ्यांचा हेतू समजला आहे. त्यांच्या या हुकूमशाही तंत्राला आता कुणीही बळी पडणार नाही, व त्यांना त्यांची जागा दाखवतील असेही ते यावेळी म्हणाले.

अमल हे संवेदनशील, सुसंस्कृत व नेतृत्वगुण असणारे व्यक्ती आहेत. येणाऱ्या काळात मूलभूत सुविधांसह मतदारसंघात सकारात्मक बदल घडविण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. गेली ५ वर्षे सत्तेत नसतानाही त्यांनी नागरिकांशी सातत्याने ठेवलेला संवाद यामुळे नागरिकांना त्यांच्याबद्दल आत्मीयता आहे. त्यांच्या हातून मतदारसंघाच्या विकासाची मोट बांधली जाईल हे निश्चित आहे. त्यामुळे २० नोव्हेंबर रोजी त्यांना मतदान करून एका विधायक नेतृत्वाला निवडून द्या, असे आवाहन त्यांनी केले.
सभेला मीनाक्षी महाडिक (काकी), गोकुळच्या संचालिका सौ. शौमिका महाडिक, शिरोली सरपंच पदमजा करपे, माजी जिल्हा परिषद सदस्य संध्याराणी बेडगे, प्रताप पाटील, शामराव शिंदे, शाहू चव्हाण, रमेश चौगले, सरपंच राणी लोहार, संजीवनी चौगले, संदीप पाटील, प्रताप मगदूम, मधुकर हवालदार, आप्पासो चौगले, सुभाष पाटील, चंद्रकांत जाधव, सर्जेराव पाटील, शिवाजी चौगले, विश्वास चौगले, अमृत जाधव, धीरज मगदूम, विक्रम कांबळे यांच्यासह महायुतीचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!