आम्ही हा निर्णय घेतला नाही तर तुरुंगात जावं लागेल
हसन मुश्रीफांनी माझ्या कानात सांगितलं, शरद पवारांचा गौप्यस्फोट
गद्दारांना गाढा, पवारांचे आवाहन
कोल्हापूर
भाजपसोबत जाण्याचा निर्णय आम्ही घेतला नाही तर तुरुंगात जावं लागेल असं एक दिवस मंत्री हसन मुश्रीफ यांनी माझ्या कानात सांगितलं असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. काही लोक मोठ्या तोंडाने सांगत आहेत की, मी पवारांना सांगून गेलो. आपण झक मारायची आणि दुसऱ्याचं नाव घ्यायचं असा हा प्रकार असल्याची जोरदार टीकाही त्यांनी केली.
कागल विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार समरजितसिंह घाटगे यांच्या प्रचारार्थ गडहिंग्लज येथे झालेल्या सभेत पवारांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. ईडीच्या भीतीने आणि तुरुंगात जाऊ लागू नये म्हणून या लोकांनी हा सगळा उद्योग केला असल्याची टीकाही त्यांनी केली.
शरद पवार म्हणाले, एकदा तुरुंगात जाऊन आलो आहे. आत्ता भाजपसोबत गेलो नसतो तर पुन्हा तुरुंगात जावं लागलं असतं असं छगन भुजबळ यांनी तर जाहिरपणे सांगितले. ज्यांचे हात बरबटलेले असतात भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच अशी भीती असते. लोकांनी निवडून दिलेल्याची बांधिलकी न जपता तुम्ही खुशाल निघून गेला असा जोरदार हल्ला अजित पवार गटावर चढवताना पवार म्हणाले, ईडीच्या भीतीने जे लोक आम्हाला सोडून गेले त्यांच्या फायली भाजपने बाजूला ठेवले आहेत. लोकं निर्लज्जासारखं आम्हाला सोडून गेले. अशा लोकांना पराभूत करा असे आवाहनही त्यांनी केले.
खासदार शाहू महाराज म्हणाले, राज्यात आता परिवर्तन केल्याशिवाय गत्यंतर नाही. त्यामुळे महाविकास आघाडीला विजयी करा. काही नेते पुरोगामी असल्याचे सांगत होते, पण त्यांनी शाहू, फुले आंबेडकरांच्या विचारांना सोडचिट्टी दिली असा टोलाही त्यांनी मंत्री मुश्रीफ यांना मारला.