विकास कामांवर चर्चेला कुठेही बोलवा मी तयार : राजेश क्षीरसागर
शिवाजी पार्क येथील मेळाव्यास नागरिकांचा उदंड प्रतिसाद
कोल्हापूर, दि. १४ : गेल्या अडीच वर्षात मी शहरात विकासकामांचा डोंगर उभा केला आहे. २०१४ पर्यंत राज्यात विरोधकांची सत्ता होती. कोल्हापूर महानगरपालिका त्यांच्या ताब्यात होती. या काळात विरोधकांनी काय केले, असा सवाल करत हिम्मत असेल तर विरोधकांनी विकासकामावर बोलावे. विकास कामांवर चर्चेला कुठेही बोलवा मी तयार असल्याचे , असे आव्हान राजेश क्षीरसागर यांनी दिले.
शिवाजी पार्क येथी गद्रे बाल उद्यान येथे आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. पुढे बोलताना क्षीरसागर म्हणाले, काँग्रेसचे नेते गृह राज्यमंत्री होते. जिल्ह्याचे पालकमंत्री होते. महानगर पालिकेतही त्यांचीच सत्ता होती. त्यांच्या काळात शहराच्या विकासासाठी त्यांनी काय ते केले सांगावे . आमदारकी नसतानाही मी शहरात केलेली विकासकामे पाहून त्यांना पोटशूळ उठले असल्याचे ते म्हणाले.
मी शहरातील पूर नियंत्रणासाठी ३२०० कोटी मंजूर करून आणले. रंकाळा परिसराच्या विकासासाठी २५ कोटी रुपये आणले. रस्त्यांसाठी १०० कोटी मंजूर झाले. केशवराव भोसले नाटय़गृहाची दुर्दैवी घटना घडल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दुसऱ्याच दिवशी कोल्हापुरात आले. त्यांनी केशवराव भोसले नाट्यगृहासाठी तातडीने २५ कोटी रुपये जाहीर केले. चोवीस तासात निधीही मंजूर केला. त्याचे कामही खासदार शाहू महाराज यांच्या हस्ते सुरू झाले आहे. आगामी काळात शहरातील शंभर टक्के रस्ते सिमेंटचे करण्याचे नियोजन केल्याचे ते म्हणाले.
महायुती सरकारने लाडक्या बहिणीसाठी साडेसात हजार रुपये दिले. योजनेला मिळत असलेला प्रतिसाद पाहून विरोधकांच्या पोटात दुखायला लागले. यामुळेच योजनेविषयी अफवा पसरवण्याचे काम केले. कॉँग्रेसने गेल्या 50 वर्षांत लाडक्या बहिणीसाठी काय केले ? , ते सांगावे मगच आमच्यावर बोलावे, असे आव्हान क्षीरसागर यांनी दिले.
यावेळी बोलताना सत्यजित उर्फ नाना कदम यांनी आगामी काळात कोल्हापुरात उच्च न्यायालयाचे खंडपीठ, अंबाबाई तीर्थक्षेत्र, शहराची हद्दवाढ, आयटी पार्क, भव्य फुटबॉल संकुल ही कामे राजेश क्षीरसागर पूर्ण करण्यास समर्थ आहेत. ती मार्गी लावल्याशिवाय ते स्वस्थ बसणार नाहीत. राज्यावर कॉँग्रेसने सुमारे ५२ वर्षे सत्ता राबवली. पण त्यांच्या कार्यकाळात महाराष्ट्राचा हवा तेवढा विकास झाला नाही. त्यांच्या दळभद्री कारभारामुळे राज्याची पिछेहाट झाली. काँग्रेसने आणि त्यांच्या बागलबच्च्यांनी किती विकासकामे केली ते सांगावे, असे आव्हान कदम यांनी दिले.
यावेळी माजी नागरसेवक आशिष ढवळे, सौ अनिता ढवळे, विश्वजीत मोहिते, विजयेंद्र घाटगे, मुकुंद सावंत,श्रीकांत कुलकर्णी राजेंद्र तोडकर,शिल्पा घोडके, सौ ढोले,अनुराधा मोहिते,संदीप गद्रे,नीरज झंवर ,नितीन सासने,योगेश भाटेजा,शक्ती मोहिते, संजय लकडे,संदीप चिगरे,अमोल कापसे,मित्तुर शाह,संजय शेट्ये,अविनाश नाईक,संपत कांबळे,जयवंत गायकवाड,संजय मांडवकर,श्री तस्ते, मनीषा आंबूपे, माधुरी शेट्ये,अनिता बुकशेट,सुनील बुकशेट , कुमार बुकशेट,केदार शेळके,सौरव माने, सौरभ शेलार आदी उपस्थित होते.