कन्व्हेन्शन सेंटरमुळे जिल्ह्याचा कायापालट होईल – महेश जाधव
राजारामपुरी येथील कोपरा सभा उत्साहात
कोल्हापूर, दि. 11 :
माजी आमदार तथा राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी गेल्या अडीच वर्षात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विकासकामांसह सामाजिक कामांचा धडाका लावला आहे. कोल्हापूर शहराच्या राजाराम तलावाकाठी आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटर उभारण्यात येणार आहे. या कन्व्हेन्शन सेंटरमुळे केवळ शहराचा नव्हे तर कोल्हापूर जिल्ह्याचा कायापालट होईल, असे प्रतिपादन भाजपाचे सचिव महेश जाधव यांनी केले.
कोल्हापूर उत्तरचे महायुतीचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांच्या राजारामपुरी येथे आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी शिवसेना उपनेत्या जयश्री जाधव, भाजप जिल्हाध्यक्ष विजय जाधव, दीपक चव्हाण, मंदार तपकिरे, अंकुश निपाणीकर आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना महेश जाधव म्हणाले, जिल्ह्यात औद्योगिक, व्यापार, बांधकाम, कृषी आदी क्षेत्रात झपाट्याने विस्तार होत आहे. यानुषंगाने सामाजिक, वैचारिक, राजकीय, सांस्कृतिक अभिसरण या सर्वांचा विचार करता विविध संघटनांच्या सामुहिक बैठका, विचारांचे अदान-प्रदान, सांस्कृतिक देवाण-घेवाण याकरिता एखादा जाहीर कार्यक्रम, बैठक, पत्रकार परिषद आयोजित करण्यासाठी शासनाचे अधिकृत कोणतेही केंद्र जिल्ह्यात उपलब्ध नाही. याचा विचार करून क्षीरसागर यांनी कोल्हापुरात कन्व्हेन्शन सेंटर व्हावे यासाठी पाठपुरावा केला.
असे सेंटर नसल्याने विचारांचे आदान- प्रदान, सांस्कृतिक देवाण-घेवाण यावर मर्यादा येतात. यामुळे अपेक्षित विकास प्रक्रिया गतिमान करताना अडथळे निर्माण होत आहेत. ही उणीव दूर करण्याच्या हेतून कोल्हापूर जिल्ह्याच्या केंद्रस्थानी कोल्हापूर शहरात कन्व्हेंशन सेंटर (परिषद केंद्र) निर्मिती करावी, अशी मागणी क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे जानेवारी २०२३ रोजी लेखी पत्राद्वारे केली होती. ही मागणी पूर्ण झाली असून आगामी काळात या सेंटरचे काम सुरू होईल, असे जाधव म्हणाले.
यावेळी बोलताना विजय जाधव म्हणाले, कन्व्हेंशन सेंटरमुळे जिल्ह्यात राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय परिसंवाद, कार्यशाळा, प्रदर्शन, बैठका, सादरीकरण अशा उपक्रमांचे आयोजन करता येईल. याचा फायदा जिल्ह्यातील शेतकरी, कामगार, व्यापार, लघु आणि मध्यम उद्योजक, उत्पादक, विक्रेते, ग्राहक, कलाकार अशा बहुतांश सर्व क्षेत्रातील लोकांना होईल.
राजेश क्षीरसागर यांनी मागणी करताच मुख्यमंत्र्यांनी याबाबत नियोजन विभागाच्या प्रधान सचिवांना याबाबत अहवाल सादर करण्यास सांगितले होते. तसेच अत्याधुनिक नॅशनल कन्व्हेंशन सेंटर उभारण्यासंदर्भातील प्रस्ताव शासन स्तरावर सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कन्व्हेंशन सेंटरसाठी राजाराम तलाव येथील जागा प्रस्तावित केली, असे जाधव यांनी सांगितले.
या ठिकाणी दोन हजार प्रेक्षक क्षमतेचे अत्याधुनिक नॅशनल कन्व्हेंशन सेंटर उभारण्यात येणार आहे.
यासाठी तातडीने निधी मिळावा यासाठी क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन अर्थसंकल्पात निधीची तरतूद करण्याची मागणी केली होती. क्षीरसागर यांनी केलेल्या पाठपुराव्यास यश आले आणि राजाराम तलावाकाठी कन्व्हेन्शन सेंटरसाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली होती. त्यानंतर कन्व्हेक्शन सेंटरची प्रक्रिया शासकीय पातळीवर सुरु झाल्याचे ते म्हणाले.
गेल्या अडीच वर्षापासून क्षीरसागर यांनी कोल्हापूर शहरात कामाचा धडाका लावला आहे. कोट्यवधी रुपयांचा निधी आणून कोल्हापूरचे नवे विकासपर्व सुरु केले आहे. यामध्ये प्रामुख्याने कोल्हापूर पूरस्थिती नियंत्रणासाठी रु.३२०० कोटी, रस्त्यांसाठी रु.१०० कोटी, अमृत २.० योजनेतून एकूण रु.२९१ कोटी, संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहासाठी रु.२५ कोटी, रंकाळा सुशोभीकरणासाठी रु.२५ कोटी, मुलभूत सोई सुविधा रु.२५ कोटी अशा अनेक कामांचा समावेश असल्याचे विजय जाधव यांनी यावेळी सांगितले.