महाडिक लाडक्या बहिणींना स्वतःच्या खिशातून पैसे देतात का ? राणी खंडागळे*

Spread the news

*महाडिक लाडक्या बहिणींना स्वतःच्या खिशातून पैसे देतात का ? राणी खंडागळे*
कोल्हापूर, :
आम्ही कोल्हापूरच्या स्वाभिमानी महिला आहोत. आम्ही काँग्रेसच्या रॅलीमध्ये, बैठकांमध्ये जाणार आहोत. तुमच्या आमची काय व्यवस्था करायची ती करा. तुमच्या या पोकळ धमक्यांना आम्ही घाबरणार नाही. लाडकी बहिण योजनेचे पैसे खासदार धनंजय महाडिक स्वतःच्या खिशातून देतात का? असा सवाल कोल्हापूर दक्षिण महिला काँग्रेस कौशल्य विभाग प्रमुख राणी खंडागळे यांनी केला. खा.धनंजय महाडिक यांनी निषेधार्थ घेतलेल्या महिला बैठकीत त्या बोलत होत्या. या बैठकीत उपस्थित महिलांनी महाडिक यांच्या वक्तव्याचा निषेध केला.
काँग्रेसच्या माजी प्रदेश महिला उपाध्यक्ष सरलाताई पाटील म्हणाल्या, महिलांना धमकीची भाषा वारंवार वापरणा-या खासदार धनंजय महाडिक यांच्या वक्तव्यामुळे त्यांची संस्कृती दिसून येते. भाजपने त्यांना वारंवार अशी वक्तव्ये करण्याची परवानगी दिली आहे का? लाडकी बहिण योजना कशासाठी आहे, महाराष्ट्रातील बहिणींची त्यांनी काय किंमत केली हे आता समोर आले असून या बहिणी त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाहीत.
माजी नगरसेविका भारती पोवार म्हणाल्या, लाडकी बहिण योजनेवरुन महिलांना अपमानित करणा-या खासदार धनंजय महाडिकांची खासदारकी रद्द करावी व त्यांना सहा वर्षे निवडणुक लढविण्यास बंदी घालावी. शासनाचे पैसे हे जनतेने भरलेल्या टॅक्समधून जमा होतात. मग महाडिक कोणाच्या जीवावर महिलांबद्दल मग्रुरीची भाषा वापरत आहेत. ही मग्रुरी कोल्हापूरची जनता या निवडणुकीतही मोडून काढेल. महाराणी ताराराणी आणि जिजाऊंचा वारसा सांगणा-या कोल्हापूरच्या स्वाभीमानी महिला तुमच्या धमकीला घाबरणार नाहीत.
दिपा पाटील म्हणाल्या, आम्ही पैसे मागायला गेलो नव्हतो. तुम्ही स्वत:ची प्रॉपर्टी विकून योजनेसाठी महिलांना पैसे देणार आहात का? महिलांचा अपमान करणा-या महाडिकांना या निवडणुकीत लाडक्या बहिणी ताकद दाखवतील.
अंजली जाधव म्हणाल्या, पंधराशे रुपयात आमचे घर चालत नाही. आम्हांला काय विकत घेतले आहे का? मुलीवर होणा-या अत्याचाराबाबत यांचे तोंड बंद का?
यावेळी संध्या घोटणे, चंदा बेलेकर, वैशाली महाडिक, भाग्यश्री पाटील, शुभांगी साखरे, मंगल खुडे, उज्वला चौगले, वैशाली जाधव यांच्यासह महिला उपस्थित होत्या.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!