*लाडक्या बहिणींच्या पाठीशी हक्काचे नेतृत्व म्हणजे अमल महाडिक : सौ अरुंधती महाडिक*
कोल्हापूर – मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारची अत्यंत लोकप्रिय योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यभरातील महिला आर्थिक दृष्ट्या सक्षम होत आहेत. त्यांच्या या सबलीकरणाच्या प्रक्रियेत आम्ही नेहमी त्यांच्यासोबत आहोत. त्यांच्या हक्काचे नेतृत्त्व अमल महाडिक त्यांच्या पाठीशी आहे. असे प्रतिपादन भागीरथी महिला संस्थेच्या संस्थापक अरुंधती महाडिक यांनी केले.
कोल्हापूर परिसरातील विविध भागातील उपनगरांमध्ये आज त्यांनी ‘मिसळ पे चर्चा’ या कार्यक्रमात भाग घेत महिलांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार अमल महाडिक यांना मतदान करण्याचे आवाहन केले. राजलक्ष्मी नगर, देवकर पाणंद इथे हा कार्यक्रम झाला.
परिसरातील विशेषतः महिलांनी त्यांच्याशी संवाद साधला. रोजच्या जगण्यातील अडीअडचणी त्यांच्यासमोर मांडल्या. भागातील पाणी प्रश्नामुळे वाया जाणारा वेळ, त्यामुळे होणाऱ्या इतर गैरसोयी यांची माहिती त्यांना दिली. यावेळी महाडिक यांनी “तुमचा आपला भाऊ तुमच्या सोबत आहे. तो नक्कीच तुम्हाला या त्रासातून बाहेर काढणार आहे. तुमच्या गुणवत्तापूर्ण राहणीमानासाठी पुढाकार घेणार आहे. त्यामुळे या विकासात्मक बदलासाठी अमल यांना मत देऊन विजयी करा, असे त्या म्हणाल्या.
यावेळी त्यांनी महायुती सरकारच्या जाहीरनाम्यातील महत्त्वाच्या बाबींची चर्चा केली. यामध्ये महिलांसाठी लाडकी बहीण योजनेच्या रकमेत केली जाणारी वाढ, २५ हजार महिला पोलिसांची भरती, अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ या मुद्दयांवर संवाद साधला. शेतकरी, युवा, ज्येष्ठ नागरिक यांच्या कल्याणाच्या योजनांची देखील माहिती दिली.
महायुती सरकार हे एक सुसंस्कृत, सुशिक्षित राज्य घडविण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यादृष्टीने पावले टाकण्यास सुरुवात झाली आहे. येणाऱ्या काळात त्या टप्प्यावर नक्कीच आपण पोहोचणार आहोत. या सर्वांचा सर्वाधिक फायदा महिलांना होणार आहे. महिलांना भयमुक्त व सुरक्षित जीवन जगण्यास प्रेरणा मिळणार आहे. महिला सक्षमीकरण तसेच स्त्री सन्मानाचे हे सरकार पुन्हा मोठ्या मताधिक्क्याने निवडून येणार आहे, असे त्या यावेळी म्हणाल्या.
याप्रसंगी अश्विनी शिंदे, अलका शिंदे, शीला मोहिते, पुष्पावती चौगले, शुभांगी भवड, अश्विनी पाटील, विजय खोपडे, सुधीर राणे, विश्वेश कुलकर्णी, निलेश निकम, संग्राम पाटील, विजय खाडे यांच्यासह परिसरातील महायुतीचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते व तमाम बंधू व भगिनी उपस्थित होत्या.